Coronavirus: नेदरलँडमध्ये ओमिक्रॉनची १३ प्रवाशांना बाधा, जर्मनी, इटलीमध्येही नव्या विषाणूचा प्रसार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 07:03 AM2021-11-29T07:03:40+5:302021-11-29T07:04:02+5:30
Coronavirus: ओमिक्रॉन विषाणूचा जगभरात झपाट्याने प्रसार होत आहे. नेदरलँडमध्ये या विषाणूने बाधित झालेले १३ रुग्ण आढळले, तर जर्मनी, इटलीमध्येही ओमिक्राॅनचे अस्तित्व आढळले आहे.
हेग : ओमिक्रॉन विषाणूचा जगभरात झपाट्याने प्रसार होत आहे. नेदरलँडमध्ये या विषाणूने बाधित झालेले १३ रुग्ण आढळले, तर जर्मनी, इटलीमध्येही ओमिक्राॅनचे अस्तित्व आढळले आहे. त्यामुळे जग धास्तावले असून, आफ्रिकेतील प्रवाशांवर बंदी घालणाऱ्या देशांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत नऊ देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.
नेदरलँड येथे शुक्रवारी ॲमस्टरडॅम येथे दोन विमानांतून आलेल्या प्रवाशांपैकी ६१ जण कोरोनाबाधित आढळले. त्यातील १३ जणांना ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. या सर्व रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. नव्या विषाणूचा युरोपमधील वाढता प्रसार बघता इंग्लंडने नागरिकांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. दुकानात खरेदीसाठी जाताना, प्रवास करताना नागरिकांनी मास्क घातलाच पाहिजे, शारीरिक अंतर राखण्याच्या सूचना ब्रिटन सरकारने दिल्या आहेत. विदेशी प्रवासी इंग्लंडमध्ये आल्यानंतर त्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्याचेही आदेश सरकार लवकरच देणार आहे.
चीनने निर्बंध सैल केल्यास भीषण स्थिती
कोरोना साथ सुरू असताना अमेरिका, फ्रान्सने अनेक निर्बंध शिथिल केले होते. तसा निर्णय चीनने घेतला तर तिथे दरदिवशी कोरोनाचे सुमारे सहा लाख तीस हजार नवे रुग्ण आढळू शकतील, असा इशारा एका अभ्यासातून देण्यात आला. पेकिंग विद्यापीठाच्या गणित विभागाने यासंदर्भात केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षात म्हटले आहे की, चीनच्या प्रयत्नांत थोडी जरी ढिलाई झाली तरी विपरीत स्थिती निर्माण होऊ शकते.
लक्षणे मध्यम स्वरूपाची
ओमिक्रॉनमुळे मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोनाची बाधा होईल, असे मत साऊथ आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. अँगेलिक्यू कोएत्झी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, ओमिक्रॉनच्या बाधेमुळे रुग्णाचे स्नायू एक-दोन दिवस दुखतील व त्याला थकवा जाणवेल. थोडासा कफ होईल. मात्र, त्यांच्या तोंडाची चव जाणे किंवा वास न येणे, या समस्या त्यांना नसतील.