Coronavirus Omicron Updates : दिलासादायक! ओमायक्रॉनच्या संकटात 'गुड न्यूज'; कोरोनाचा वेग मंदावतोय, WHO ने शेअर केला नवा डेटा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 02:55 PM2022-01-16T14:55:56+5:302022-01-16T14:56:17+5:30
भारतासह जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंटचे (Omicron Variant) मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत आहेत.
भारतासह जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंटचे (Omicron Variant) मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत आहेत. दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरिअंट हा डेल्टा व्हेरिअंटपेक्षा कमी धोकादायक आहे, असं म्हटलं जातंय. परंतु ते अधिक संसर्गजन्यदेखील आहे. या परिस्थितीतच जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) एक चांगली बातमी समोर आली आहे. आफ्रिकेतील चौथी लाट हळूहळू कमी होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
६ आठवड्यांच्या वाढीनंतर, आफ्रिकेत आमायक्रॉन व्हेरिअंटमुळे आलेली चौथी लाट आता कमी होऊ लागली आहे. ११ जानेवारीपर्यंत, आफ्रिकेत कोरोनाचे १०.२ दशलक्ष रुग्ण समोर आले होते. दक्षिण आफ्रिकेत या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. परंतु एका आठवड्यात त्या ठिकाणच्या रुग्णांच्या संख्येत १४ टक्क्यांची घट झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन विषाणूची प्रथम ओळख पटवण्यात आली होती. तेथे देखील साप्ताहिक संसर्गामध्ये ९ टक्क्यांची घट झाली. पूर्व आणि मध्य आफ्रिकन क्षेत्रातही घट नोंदवली गेली आहे. उत्तर आणि पश्चिम आफ्रिकन क्षेत्रात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. उत्तर आफ्रिकेत गेल्या आठवड्यात १२१ टक्क्यांची वाढ झाली आहे. हे लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेनं अधिक लसीकरण करण्याबाबत सूचना केल्या आहेत.
लसीची आवश्यकता
"सुरुवातीची चिन्हे सूचित करतात की देशातील चौथी लाट वेगवान आणि लहान होती. परंतु अस्थिरतेची कमतरता नाही. आफ्रिकेत महासाथीचा सामना करण्यासाठी ज्या महत्त्वाच्या उपाययोजनांची नितांत गरज आहे, ती अजूनही सुरू आहे. परंतु त्यासाठी इथल्या लोकांना लवकरात लवकर कोरोनाची लस मिळणेही आवश्यक आहे," अशी प्रतिक्रिया आफ्रिकेतील डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक डॉ. मात्शिदिसो मोएती यांनी दिली.
गेब्रेयसेस यांनी व्यक्त केली होती चिंता
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी देखील अलीकडेच चिंता व्यक्त केली की, "आफ्रिकेच्या ८५ टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येला अद्याप लसीचा एकही डोस मिळालेला नाही. संपूर्ण खंडातील लोकसंख्येपैकी केवळ १० टक्के लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण केले गेले आहे." आफ्रिकेतील डब्ल्यूएचओच्या Vaccine-Preventable Disease Program कार्यक्रमाचे प्रमुख अॅलेन पॉय म्हणाले की, कोरोनाविरूद्ध लसीकरण होणाऱ्या आफ्रिकन लोकांची संख्या सध्या ६ दशलक्षांपेक्षा कमी आहे, ती एका आठवड्यात ३४ दलशक्षांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे.