coronavirus: अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या एक लाखांपार, आतापर्यंत १७ लाख जणांना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 09:36 AM2020-05-27T09:36:36+5:302020-05-27T09:39:19+5:30
कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे.
वॉशिंग्टन - जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका जागतिक महाशक्ती असलेल्या अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधिती आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, अमेरिकेत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्याही १७ लाखांच्या पलिकडे गेली आहे. बुधवारच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत १७ लाख २५ हजार २७५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत देशात १ लाख ५७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर गेल्या काही दिवसांपासून ब्राझीलमधील कोरोनाचा प्रकोप वाढला असून, येथे कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ३ लाख ९४ हजार ५०७ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २४ हजार ५९३ जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिका आणि ब्राझीलपाठोपाठ रशियामध्येही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असून, रशियात आतापर्यंत ३ लाख ६२ हजार ३४२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, ३ हजार ८०७ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र रशियामध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबाबत तज्ज्ञांकडून शंका व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, वरिष्ठ आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार जग अजूनही कोरोना महामारीच्या फेऱ्यात फसलेले आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येण्याची आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरू होण्याची शक्यता धुसर झाली आहे. सध्या दक्षिण अमेरिका, दक्षिण आशिया आणि इतर भागात कोरोनाच्या संसर्गात वेगाने वाढ होत आहे, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध
गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी