Coronavirus: आम्ही लग्नाळू! लॉकडाऊन हटताच ‘या’ देशात ऑनलाईन विवाह नोंदणीत ३०० टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 02:47 PM2020-04-11T14:47:04+5:302020-04-11T14:48:30+5:30
चीनच्या वुहान शहरात कोरोना महामारी मोठ्या प्रमाणात पसरली या महामारीमुळे वुहानमध्ये लोकांना सक्तीनं घरात बंदिस्त ठेवण्यात आलं होतं.
वुहान – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील २०० देशांना विळखा घातला आहे. १७ लाखांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाऊन केले आहे. चीनमध्ये लॉकडाऊन केल्यामुळेच कोरोना संक्रमण नियंत्रणात आणता आलं.
चीनच्या वुहान शहरात कोरोना महामारी मोठ्या प्रमाणात पसरली या महामारीमुळे वुहानमध्ये लोकांना सक्तीनं घरात बंदिस्त ठेवण्यात आलं होतं. अखेर ७६ दिवसांच्या कालावधीनंतर चीनमधील लॉकडाऊन हटवण्यात आलं आहे. फ्लाईट्स, बस, ट्रेन वाहतूक सुरु झाली आहे. थिएटर, मॉल्स, भाजी मार्केट उघडण्यात आली आहे. याठिकाणी लॉकडाऊन हटताच युवक वर्गाने लग्नाचा सपाटा सुरु केला आहे. लग्नासाठी ऑनलाईन वेबसाईटवर ३०० टक्के ट्रॅफिक वाढलं आहे. चीनमध्ये सर्वात जास्त वापर होणाऱ्या पेमेंट अँपनुसार एकाच वेळी इतके युजर्सने अँपचा वापर केला त्यामुळे ते बंद पडलं. परंतु वेबसाईट क्रॅश झाली नाही. मात्र वारंवार रिफ्रेश करण्याची गरज भासू लागली.
विवाह नोंदणी करणाऱ्या भावी वधुवरांची संख्या वाढली आणि लग्नाच्या कपड्यांची बुकींगही वाढली आहे. फेब्रुवारी आणि मार्चपासून लग्नाचे रजिस्ट्रेशन बंद करण्यात आले होते. मात्र स्थिती सामान्य होताच लोकांनी पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात लग्नांची तयारी सुरु केली. वुहानसह अनेक शहात प्री-वेडिंग शूट सुरु झालेत. कपल्स वेगवेगळ्या लोकेशनवर जाऊन फोटोशूट करत आहेत. त्याचसोबत आवश्यक सावधानतही पाळली जात आहे.
चीनमध्ये विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करताना जोडप्यांना आपला आरोग्य अहवालही सादर करावा लागणार आहे. कोरोना तपास रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण मानली जाईल. अॅलिपेच्या प्रवक्त्याने सांगितले की, लॉकडाऊनमुळे घटस्फोटाच्या प्रमाणातही वाढ झाली होती मात्र यानंतर, अचानक विवाह नोंदणीच्या बाबतीत इतकी वाढ होईल, अशी अपेक्षा नव्हती. लॉकडाऊनमुळे अनेकांना घराची बसावं लागलं होतं. कोणालाही एकमेकांना भेटता येत नव्हतं मात्र लॉकडाऊन हटवताच लोकांनी पहिल्यांदा विवाह उरकण्यास प्राधान्य दिलं आहे.