CoronaVirus : पाकच्या राष्ट्रपतींनी घातले N- 95 मास्क, डॉक्टर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 12:56 PM2020-04-09T12:56:30+5:302020-04-09T13:06:15+5:30
CoronaVirus: पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ४३१७ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ६३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
इस्लामाबाद : कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे सामान्य लोकांची परिस्थिती चिंताजनक आहे. तसेच, कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरही चिंतेत आहे. कारण, या डॉक्टरांना सेफ्टी इक्विपमेंट मिळत नाही आहेत. यातच राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांना एका बैठकीत N- 95 मास्क घातल्यामुळे येथील मेडिकल स्टाफ चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले.
डॉ. आरिफ अल्वी यांनी एका बैठकीत N- 95 मास्क घातले होते. यावर डॉक्टरांनी सवाल उपस्थित केला आहे. पाकिस्तान मेडिकल असोशिएशनने डॉ. आरिफ अल्वी यांचे नाव न घेता परिपत्रक काढले आहे. यामध्ये मेडिकल स्टाफसाठी N- 95 मास्क आणि सुरक्षा उपकरणांची कमतरता असताना सध्या बैठक किंवा दौऱ्यांमध्ये नेतेमंडळी आणि नोकरदारवर्ग N- 95 मास्क वापरत आहेत, असे म्हटले आहे. याचबरोबर, N- 95 मास्क प्रत्येकासाठी गरजेचा नाही. हा मास्क अशा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आहे की, जे फक्त क्वारंटाइन आणि आयसोलेशन वार्डमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांना संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.
दुसरीकडे, पाकिस्तान यंग फार्मासिस्ट असोशिएशनने क्वेटामध्ये डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट आणि पॅरामेडिकल स्टाफला मारहाण केल्याप्रकरणी पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्र लिहिले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी क्वेटामध्ये सेफ्टी इक्विपमेंटची मागणी करणाऱ्या डॉक्टरांना पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ४३१७ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ६३ लोकांचा मृत्यू झाला आहे.