CoronaVirus: उचलली जीभ...! पॅकेजची जुळवाजुळव करताना इम्रान खानना घामच फुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 12:46 PM2020-03-27T12:46:46+5:302020-03-27T12:51:49+5:30
CoronaVirus in Pakistan पाकिस्तानने नेहमीच अब्जावधी डॉलरची परकीय मदत भारताविरोधात दहशतवादी कारवाया, दहशतवाद्यांना पोसण्यामध्ये खर्च केली. याचा परिणाम असा झाला की, पाकिस्तानमध्ये विकासकामे कमी झाली आणि उधळपट्टीच जास्त.
इस्लामाबाद : कोरोना व्हायरसशी दोन हात करताना पाकिस्तानची हालत खराब होत चालली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोनाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्य़ासाठी १.१३ ट्रिलियन( १ लाख १३ हजार कोटी) रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले खरे पण त्यांच्याकडे तेवढा पैसाच नाहीय. यामुळे लोकांना देण्यासाठी घोषणा केली खरी पण द्यायचे कसे, अशा मोठ्या यक्षप्रश्नात सध्या पाकिस्तान सरकार अडकले आहे.
पाकिस्तानने नेहमीच अब्जावधी डॉलरची परकीय मदत भारताविरोधात दहशतवादी कारवाया, दहशतवाद्यांना पोसण्यामध्ये खर्च केली. याचा परिणाम असा झाला की, पाकिस्तानमध्ये विकासकामे कमी झाली आणि उधळपट्टीच जास्त. याचा आता पश्चाताप पाकिस्तानला होऊ लागला आहे. कारण पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा ११९३ वर गेला असून आता त्या देशात कोरोनाचा कहर सुरु होणार आहे.
पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन केल्याने आधीच गरीब ठेवलेल्या लोकांचे हाल सुरू झाले आहेत. यामुळे घोषणा केलेल्या पॅकेजचे पैसे गोळा करण्यासाठी इम्रान खान आता आयएमएफ, जागतिक बँक आणि एडीबीसमोर दयेची भीक मागू लागले आहेत.
पाकिस्तान सरकारने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी तब्बल ३.७ अब्ज डॉलरचे कर्ज मागितले आहे. इम्रान खान यांचे वित्तिय सल्लागार अब्दुल हाफिज शेख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये याची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकिस्तानला १.४ अब्ज डॉलर, जागतिक बँक १ अब्ज डॉलर आणइ आशियाई शिखर बँकेकडून १.२५ अब्ज डॉलरचे कर्ज घेण्यात येणार आहे.
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण पाकिस्तानात सैन्याला पाचारण करण्यात आलं आहे. बिघडलेली परिस्थिती पाहता पंतप्रधान इमरान खान यांनी जागतिक बँक आणि अन्य देशांकडे कर्जासाठी विनवणी केली. पाकिस्तानला मिळालेल्या कर्जानंतर पंतप्रधान इमरान खान यांनी १.१३ ट्रिलियनचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. इमरान खान यांनी सांगितले की, या पॅकेजतंर्गत मजूरांना २०० अरब डॉलर(४ हजार रुपये), संकटात असलेल्या कुटुंबाला १५० अरब डॉलर(३ हजार) रुपये देणार आहे. तसेच गरीब कुटुंबाला मिळणाऱ्या भत्त्यातही १ हजारांनी वाढ करण्यात आली आहे.