coronavirus : वाढत्या अश्लीलतेवर संतापून अल्लाने धाडला कोरोना, पाकिस्तानी मौलवींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 12:47 PM2020-04-26T12:47:34+5:302020-04-26T12:53:36+5:30
कोरोना विषाणूच्या रुपात जग अल्लाच्या कोपाचा सामना करत आहे. अल्लाच्या या कोपाचे कारण वाढती अश्लीलता आणि नग्नता हे आहे.
इस्लामाबाद - कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगातील अनेक देश कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हतबल झाले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे पसरलेली साथ हा अल्लाचा शाप आहे. जगभरातील वाढती नग्नता आणि अश्लीलतेवर संतापून ईश्वराने ही साथ पाठवली आहे, असा दावा पाकिस्तानातील एका मौलवीने केला आहे. दरम्यान, या मौलवीच्या विधानावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.
मौलाना तारिक जमील या मौलवीने पाकिस्तानच्या राष्ट्रीय टेलिव्हिजनवर पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोना पीडितांसाठी मदतनिधी गोळा करण्यासाठी आयोजित केलेल्या टेलिथॉनदरम्यान हे विधान केले होते.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार मौलाना जमील यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या रुपात जग अल्लाच्या कोपाचा सामना करत आहे. अल्लाच्या या कोपाचे कारण वाढती अश्लीलता आणि नग्नता हे आहे. मुलींकडून नृत्य करवून घेतले जात आहे. त्यांचे कपडे कमी होत आहेत. समाजात अश्लीलता सर्वसामान्य बाब झाली आहे, त्यामुळे अल्ला नाराज झाले आहेत.
दरम्यान, मौलानांच्या या विधानावर सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे विधान महिलांचा अपमान करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मौलानांचे हे विधान कोरोनाविषयीचे अज्ञान आणि महिलविरोधी मानसिकता दाखवते, असे शिरीन माजरी यांनी म्हटले आहे.
जगातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा विचार केल्यास जगभरात आतापर्यंत कोरोनाचे 28 लाख 96 हजार 959 रुग्ण सापडले आहेत. तर 2 लाख 02 हजार 845 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात आतापर्यंत 8 लाख 16 हजार 550 कोरोनाबाधित बरे झाले आहेत.