CoronaVirus News :आम्ही उद्ध्वस्त झालोय, मदत करा; इम्रान खान यांच्या अर्थ सल्लागाराची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 11:05 AM2020-05-11T11:05:13+5:302020-05-11T11:09:23+5:30
येत्या संकटाच्या कठीण परिस्थितीसाठी तयार राहावे लागणार आहे.
इस्लामाबाद: कोरोनानं जगभरात थैमान घातला असून, पाकिस्तानलाही याचा फटका बसला आहे. कोरोनाच्या संकटामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी जागतिक स्तरावर पाकिस्तानला मदत करण्याचं आवाहन केलं होतं. आता त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे वित्त व महसूल सल्लागार अब्दुल हाफिझ शेख यांनी कोरोनामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत खराब असून, अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे, याची कबुली दिली आहे. अब्दुल हाफिजने असा इशारा दिला आहे की, कर्जाच्या समस्येमुळे आम्ही आधीच संकटात सापडलो होतो, परंतु कोरोना संसर्गामुळे अडचण आणखी वाढली आहे. येत्या संकटाच्या कठीण परिस्थितीसाठी तयार राहावे लागणार आहे.
डॉनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अब्दुल हाफिज शेख यांना इम्रान सरकारमध्ये अर्थमंत्रिपदाचा दर्जा मिळालेला आहे, तरीही ते फक्त सल्लागारांच्या भूमिकेतच काम करतात. अब्दुल हाफिज शेख म्हणाले, कोरोना विषाणूपूर्वी पाकिस्तानमध्ये वित्तीय तूट 7.6 टक्के होती. पण आता कोरोना विषाणूनंतर ती 8 टक्क्यांवर जाईल आणि तसेच ती 9 टक्क्यांपर्यंतही जाऊ शकते. शेख यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, कोरोनामुळे आता येणारा करही पूर्वीसारखा येणार नाही. त्यामुळे सरकारला पैशांची अडचण होऊ शकते.
अर्थव्यवस्था दीड टक्क्यांनी घसरणार
यंदाच्या वर्षात पाकिस्तानची अर्थव्यवस्था एक ते दीड टक्क्यांपर्यंत घसरणे अपेक्षित असल्याचे शेख यांनी सांगितले. असे सांगून शेख यांनी IMFनं व्यक्त केलेल्या भीतीला अधिकृतपणे दुजोरा दिला. सन 2019-20 मध्ये पाकिस्तान 2.4% दराने आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत इम्रान सरकारला आपली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ते म्हणाले, 'वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँक आम्हाला विशेष पॅकेजेस देत आहेत. जर कर्ज देणारे आता आमच्या दारात आले नाहीत, तर आम्हाला हे पैसे पाकिस्तानमध्ये आवश्यक वस्तूंवर खर्च करता येतील.
आयएमएफने दिला दिलासा
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तानला तीन वर्षांसाठी 6 अब्ज डॉलर्सचे बेलआउट पॅकेज दिले आहे. त्यामुळे इम्रान सरकारला अर्थव्यवस्थेचा कर आधारित महसुलातील तूट भरून काढण्यास या पैशांची मदत होणार आहे. शेख यांनी सांगितले आहे की, पाकिस्तानला यंदा 3.9 ट्रिलियन पाकिस्तानी रुपये करातून मिळतील, जे 4.8 ट्रिलियन रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा 19 टक्के कमी आहेत. त्याशिवाय आयएमएफने पाकिस्तानला 1.38 अब्ज डॉलर्सचे जलद वित्त पॅकेजदेखील दिले आहे. जेणेकरून कोरोना विषाणूमुळे होणा-या आर्थिक संकटात नुकसान भरून काढण्यास मदतगार ठरणार आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Lockdown News: "शहरातील 'त्यांना' बाहेरचे समजतात अन् गावात कोरोनाच्या भीतीनं प्रवेश मिळत नाही"
"आताचं संकट मोदींना झेपणारं नाही; त्यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन करावं"
Lockdown News: आजपासून ५ दिवसांसाठी मोदी सरकारची योजना; घरबसल्या करा स्वस्तात सोनं खरेदी!
पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?
ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज