Coronavirus : 'संकटकाळात आम्ही मित्रासोबतच'; इस्रायलनं भारताला पाठवली वैद्यकीय मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 01:54 PM2021-05-06T13:54:11+5:302021-05-06T13:55:45+5:30
शेकडो ऑक्सिजन जनरेटर, श्वसन यंत्र आणि भारतासाठी वैद्यकीय उपकरणे भारताकडे रवाना
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्यानं आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण येत आहे. अनेक देशांनी भारतालावैद्यकीय मदतीसाठी हात पुढे केला आहे. तर दुसरीकडे भारताचा मित्र समजल्या जाणाऱ्या इस्रायलनंही भारतासाठी वैद्यकीय मदत पोहोचवण्यास सुरूवात केली आहे. या आठवडाभरात विविध विमानांच्या सहाय्याने ही मदत भारतात येणार असून त्यासाठी इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद, आरोग्य मंत्रालय, आर्थिक मंत्रालय यांच्यासोबत तेल-अवीवमधील भारतीय दूतावास आणि नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाचंही मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे.
इस्रायलनं भारताला हजारो वैयक्तिक किंवा सामूहिक वापरासाठी असलेले ऑक्सिजन जनरेटर, श्वसनाला मदत करणारे रेस्पिरेटर, औषधं आणि वैद्यकीय सामुग्री पाठवण्यास सुरूवात केली आहे. "भारत हा आमच्या सगळ्यात जवळच्या आणि महत्त्वाच्या मित्रदेशांपैकी एक आहे. भारतातील संकटाच्या या प्रसंगी इस्रायल भारतासोबत असून आमच्या भारतीय बाधंवाचे प्राण वाचवणारी वैद्यकीय उपकरणे आणि अन्य प्रकारची मदत पाठवत आहे. भारत आणि इस्रायलमधील संबंध सामरिक भागीदारीच्या स्वरुपाचे असून त्यात राजकीय, सुरक्षा आणि आर्थिक विषयांचा समावेश आहे,” अशी प्रतिक्रिया इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गाबी अश्कनाझी यांनी दिली.
#IsraelStandsWithIndia 🇮🇳🇮🇱 https://t.co/h49bATO5SF
— Israel in Mumbai (@israelinMumbai) May 5, 2021
या संयुक्त मदत कार्यात इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाची आर्थिक संबंध शाखा, इस्रायल-भारत चेंबर ऑफ कॉमर्स, द इस्रायल-एशिया चेंबर ऑफ कॉमर्स, मॅन्युफॅक्चरर्स असोसेशियन ऑफ इस्रायल, द फेडरेशन ऑफ इंडो-इस्रायली चेंबर्स ऑफ कॉमर्स, द इस्रायल एक्सपोर्ट इन्स्टिट्यूट, द स्टार्ट अप नेशन सेंट्रल यांच्यासह भारतात काम करणाऱ्या कंपन्यांचाही समावेश आहे. अमडॉक्स या कंपनीने १५० ऑक्सिजन जनरेटर भारताला देण्याची घोषणा केली आहे. ज्युईश जॉइंट डिस्ट्रिब्युशन कमिटी ऑक्सिजन सिलेंडर देणार असून मुंबईचे केइएम हॉस्पिटल, पनवेलचे महात्मा गांधी हॉस्पिटल आणि अहमदाबादच्या सरदार पटेल हॉस्पिटलला वेंटिलेटर पुरवणार आहे. कोरोना संकटाच्या सुरुवातीला भारताने इस्रायलला मास्क, पीपीइ किट आणि औषधं बनवण्यासाठी कच्चा माल पुरवला होता, तसेच भारतात रहाणाऱ्या इस्रायली नागरिकांना परत पाठवण्यातही मदत केली होती.