कोरोना हे शेवटचं संकट नाही, पैसा फेकून महामारी जात नाही; WHO चे प्रमुख स्पष्टच बोलले!
By मोरेश्वर येरम | Published: December 27, 2020 09:22 AM2020-12-27T09:22:31+5:302020-12-27T10:18:25+5:30
पहिल्या आंतरराष्ट्रीय साथीचा तयारीच्या दिवसाचे औचित्यसाधून गेब्रियेसस यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे.
जिनेव्हा
कोरोना व्हायरसचे संकट हे काही अंतिम संकट नाही. हवामान बदल आणि प्राणी कल्याणाचा वसा न सोडता मानवी आरोग्य सुधारण्याचे प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी म्हटलं आहे.
पहिल्या आंतरराष्ट्रीय साथीचा तयारीच्या दिवसाचे औचित्यसाधून गेब्रियेसस यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. यात त्यांनी महत्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली आहेत. साथीच्या रोगाच्या उद्रेकावेळी पाण्यासारखा पैसा फेकून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करायचा पण भविष्यातील तयारीसाठी काहीच करायचं नाही हे अतिशय धोकादायक चक्र असल्याचं गेब्रियेसस म्हणाले.
कोरोना व्हायरसच्या संकटातून आपल्याला धडा घेण्याची नितांत गरज असल्याचंही ते म्हणाले. "बऱ्याच काळापासून संपूर्ण जगात चिंता आणि दुर्लक्ष करण्याचे चक्र सुरू आहे. आम्ही उद्रेक होतो तेव्हा पैसा फेकतो आणि संकट संपलं की सारंकाही विसरुन जातो. भविष्यात अशा संकटांना प्रतिबंध करण्यासाठी काहीच करत नाही हा चुकीचा आणि धोकादायक दृष्टीकोन आहे. स्पष्ट सांगायचं झालं तर ही मानसिकता समजणं अत्यंत कठीण होऊन बसलं आहे", असं रोखठोक मत गेब्रियेसस यांनी मांडलं आहे.
"इतिहास आपल्याला सांगतो की ही काही शेटवची साथ नाही. साथीचे रोग ही जीवनाची वास्तविकता आहे. साथीच्या रोगाने मानव, प्राणी आणि पृथ्वी यांच्या आरोग्यामधील संबंधांवर प्रकाशझोत टाकण्याचं काम केलं आहे. हवामान बदलाच्या समस्येमुळे पृथ्वीवर होणारे परिणाम, मानव आणि प्राणी यांचे भूतलावरील महत्व लक्षात घेऊन मानवी आरोग्य सुधारण्यासाठीचे प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे", असंही ग्रेब्रियेसस म्हणाले.