Coronavirus: दुसऱ्या महायुद्धातून मिळाली ‘तिला’ लढण्याची शक्ती; ९४ वर्षीय महिलेने कोरोनालाही हरवलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 04:05 PM2020-04-16T16:05:10+5:302020-04-16T16:07:05+5:30
या वृद्ध महिलेने दुसरे महायुद्ध आणि १९३० पूर्वी महामंदीचं सावटही अनुभवलं होतं.
नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनाचा प्रार्दुभाव जगातील २०० हून अधिक देशात पसरला आहे. कोरोनाच्या जाळ्यात लहान मुले आणि वृद्ध लवकर अडकतात असं सांगितले जातं. ज्येष्ठांना कोरोनाची लागण झाली तर त्यांच्या जीवाला जास्त धोका असतो. मात्र ऑस्ट्रेलियामधील ९४ वर्षीय महिला मॉरिन कोरोना संसर्गातून वाचली आहे. या वृद्ध महिलेला कोरोना संसर्ग झाल्यानंतर मेलबर्नच्या ऑस्टिन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
९४ वर्षीय मॉरिनची तब्येत इतकी खालावली होती की डॉक्टरांनाही तिच्या वाचण्याची अपेक्षा नव्हती. पण उपचारानंतर काही दिवसात मॉरिन पूर्णत: बरी झाली. हे पाहून हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचारी अवाक् झाले. या वृद्ध महिलेने कोरोनाला हरवून पुन्हा घरी परतली आहे. डिस्चार्ज दिल्यानंतर हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. डॉक्टरांनी सांगितले की, या महिलेला कोरोनाची लागण झाली तरीही त्यांनी भीती नव्हती. कोरोनासारख्या भयंकर आजारातून त्या ठिक झालेल्या पाहून त्यांच्या कुटुंबातील लोकांनाही धक्का बसला.
या वृद्ध महिलेने दुसरे महायुद्ध आणि १९३० पूर्वी महामंदीचं सावटही अनुभवलं होतं. त्या काळात तिने खूप त्रास सहन केला होता. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीशी लढण्याची शक्ती तिच्या मनात वाढत गेली. आजारी असूनही या महिलेचा आत्मविश्वास बघण्यासारखा होता. तिच्या चेहऱ्यावर जराही निराशा नव्हती. हॉस्पिटलमधून जेव्हा तिला डिस्चार्ज दिला त्यावेळी त्यांचा उत्साहही खूप दिसला असं डॉक्टरांनी सांगितले तर आरोग्य कर्मचाऱ्यांनी मला आपुलकीची वागणूक दिली त्याबद्दल मॉरिन यांनी सर्वांचे आभार मानले.
मॉरिनशिवाय कोरोना व्हायरसवर १०४ वर्षीय वृद्धाने मात दिली आहे. विलियम लैपशेज नावाचे हे गृहस्थ दुसऱ्या महायुद्धावेळी वेटर म्हणून काम केले आहे. दुसऱ्या महायुद्धात सैनिकांसाठी बनवलेल्या अमेरिकेतील ओरेगाव येथील घरांमध्ये ते राहत होते. १० मार्चला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. त्यांचा १०४ वा वाढदिवस उपचारानंतर घरी परतल्यावर मोठ्या आनंदाने कुटुंबाने साजरा केला.