CoronaVirus: कोरोनानं मरायचं की भूकबळीनं?; बोलावियामध्ये जगण्यासाठी दुहेरी संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 06:13 AM2020-04-24T06:13:31+5:302020-04-24T06:14:35+5:30

बोलाविया सरकार हतबल आहे. एक सैन्य सोडलं, तर दुसरी काही व्यवस्थाच त्यांच्याकडे नाही, जी कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करू शकेल.

CoronaVirus problem of starvation arises in bolivia due to lockdown | CoronaVirus: कोरोनानं मरायचं की भूकबळीनं?; बोलावियामध्ये जगण्यासाठी दुहेरी संघर्ष

CoronaVirus: कोरोनानं मरायचं की भूकबळीनं?; बोलावियामध्ये जगण्यासाठी दुहेरी संघर्ष

googlenewsNext

दक्षिण अमेरिकेतील बोलाविया, अर्जेंटिना देश आधीच गरिबी आणि अस्मानी सुलतानी संकटांनी होरपळलेले आहेत. त्यात आणि तिथं कोरोना पोहोचला. बोलावियामध्ये सध्या कोरोना विषाणूचे ६७२ पॉझिटिव्ह आणि ४० मृत्यू, अशी आकडेवारी आहे; मात्र, या कोरड्या आकडेवारीपलिकडे आहे या देशातल्या भीषण लॉकडाऊनची गोष्ट.

बोलाविया देशात मोठे उद्योग नाहीत. सगळा व्यवसाय- व्यापार रस्त्यावर चालतो. साधारणत: १५ लाख नागरिक या देशात फिरतेविक्रेते, स्ट्रिट वेंडर्स आहेत. त्यांचं पोट त्याच्यावरच चालतं. या देशाच्या सरकारने कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केलं आणि या व्यापारी, व्यावसायिकांचं काम ठप्प झालं. सरकारने वायदाही केला की, आम्ही सगळ्यांना अन्नधान्य देऊ; मात्र, सरकार सर्वदूर पोहोचू शकत नाही, यंत्रणेच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत.
एकीकडे बोलावियातलं स्ट्रिट फूड अत्यंत नावाजलं जातं. ते खायला लोक विदेशातून येतात. ते खाणं हा काहींना साहसी खेळही वाटतो आणि मग बोलावियात स्ट्रिट फूड खाताना अमूक काळजी घ्या, तमूक करा, असे लेखही व्हायरल केले जातात.

आता ते सारंच ठप्प झालं आहे आणि तेथील माणसांचे हातच नाहीत तर पोटही रिकामी राहू लागली आहेत. आता तिथंही तोच गंभीर प्रश्न आहे की, कोरोना संसर्गानं मरायचं की भूकबळीनं. आता बोलावियातले नागरिकही बोलू लागलेत की, अशा संकटकाळात आमचा बहुतेक भूकबळी जाणार...
न्याताहा नावाची महिला एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला सांगते की, मला सहा मुलं असून, मी एकल माता आहे. माझ्या हाताला काही काम नाही, तर या मुलांचं पोट मी कसं भरू शकते? यावर तिथलं सरकार म्हणतं, ‘अन्न देऊ.’ पण ते कधी देणार, आम्ही मेल्यावर?’

बोलाविया सरकारही दुसऱ्या बाजूला हतबल आहे. एक सैन्य सोडलं, तर दुसरी काही व्यवस्थाच त्यांच्याकडे नाही, जी कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करू शकेल.

सैन्याच्या धाकाने आधी लोक घरात बसवले आणि आता तेच सैन्य अन्नधान्य पोहोचवणं तसेच औषधं, पेट्रोल आणि जीवनावश्यक गरजा पोहोचवत आहे. आरोग्य यंत्रणा उभी राहते आहे, ती सज्ज होते आहे, तोवर सैनिकी दवाखाने वापरण्यात आले.

सैन्याच्या मदतीनं सरकार संकटाशी दोन हात करत आहे; मात्र, या साऱ्याला मानवी चेहरा नाही. भुकेल्या माणसांचं काय होईल, याचं उत्तर आजच्या घडीला नाही. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी तिथलं सरकार राबतं आहे, हेदेखील खरं आहे आणि माणसं उपाशी आहेत हेसुद्धा...

Web Title: CoronaVirus problem of starvation arises in bolivia due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.