Coronavirus: उंदरांतील कोरोना विषाणू नष्ट झाल्याचे सिद्ध; इटलीच्या शास्त्रज्ञांना मिळालं यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 06:42 AM2020-05-07T06:42:25+5:302020-05-07T06:42:37+5:30
मानवी पेशीतील कोरोनाचे विषाणू या लसीमुळे नष्ट झाल्याचे आढळून आले.
रोम : इटलीच्या शास्त्रज्ञांनी बनविलेली लस प्रयोगाच्या वेळी उंदरांमध्ये टोचली असता एकाच इंजेक्शननंतर त्यांच्या शरीरात त्वरित निर्माण झालेल्या रोगप्रतिकारक घटकांनीकोरोनाच्या विषाणूंना प्रतिबंध केला. याच लसीने मानवी पेशींतील कोरोना विषाणूला नष्ट केल्याचेही आढळून आले. अशा प्रकारची लस शोधण्याचे प्रयोग जगभरात सुरू असले तरी त्यात इटलीमध्ये मिळाले तसे यश अद्याप कुठेही मिळालेले नाही. या लसीची माणसांवर येत्या बनविण्याचे प्रयोग करत आहे. त्या कंपनीचे सीइओ लुइगी आॅरिसिसीको यांनी सांगितले की, कोरोना साथीने हाहाकार माजविलेल्या व प्रचंड मनुष्यहानी झालेल्या देशांमध्ये इटलीचा समावेश आहे. या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी लस शोधण्याचे प्रयोग रोममध्ये सुरू आहेत. त्यासाठी शास्त्रज्ञांनी उंदरांवर प्रयोग केले.
मानवी पेशीतील कोरोनाचे विषाणू या लसीमुळे नष्ट झाल्याचे आढळून आले. या प्रयोगासाठी इटलीतील शास्त्रज्ञांनी माणसांतील रक्तद्रव्य (सिरम) वेगळे काढले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोगप्रतिकारक घटक असतात. या रक्तद्रव्याची स्पालनझानी इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये तपासणी करण्यात आली. रोगप्रतिकारक घटक विषाणूबरोबर लढताना देत असलेला प्रतिसाद किती काळ टिकून राहातो याचे निरीक्षण या संस्थेतील प्रयोगांत करण्यात आले. स्पाईक डीएनए प्रोटीनच्या आधाराने ही लस बनविण्यात आली आहे. या लसीमुळे फुफ्फुसाच्या पेशींमध्ये रोगप्रतिकारक घटक निर्माण होण्यास खूप मदत होते. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूंना अटकाव करता येतो.
अमेरिकेच्या औषध कंपनीची मोलाची मदत
टाकीस या कंपनीचे सीइओ लुइगी आॅरिसिसीको यांनी सांगितले की, कोरोनावर प्रतिबंधक लस शोधण्यासाठी इटलीमध्ये चाललेल्या प्रयोगांनी बराच पुढचा टप्पा गाठला आहे. आता या लसीचे माणसांवर काही काळातच प्रयोग सुरू होतील. त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. अमेरिकेतील लिनेआरेक्स औषध कंपनीची या संशोधनात टाकीसला खूप मदत होत आहे. या लसीवरील प्रयोग यशस्वी ठरल्यास ती त्यानंतर लवकरात लवकर उपलब्ध करून दिली जाईल असेही आॅरिसिसीको यांनी सांगितले.