Coronavirus: घरी जायला न मिळाल्याने परदेशी नागरिकांचा राडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 11:46 PM2020-05-04T23:46:24+5:302020-05-04T23:46:34+5:30
अनेक इजिप्शिअन नागरिक रस्त्यावर येऊन कुठे आहे आमच्या सरकारचा दुतावास? काय करताहेत तिथली लोकं? आम्हाला मायदेशी का जाऊ देत नाही?
कुवेत/इजिप्त
स्थलांतरित मजुरांचा मोठा प्रश्न कोरोनामुळे जगभरात उद्भवला आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात अनेक ठिकाणी स्थलांतरित मजूर, कामगारांच्या मदतीमुळेच त्या त्या देशातील अर्थव्यवस्था, उद्योगधंदे टिकून आहेत; पण कोरोनाकाळात उद्योगधंदेच बुडाल्याने अनेकांच्या हातातला रोजगार गेला आणि सगळं सोडून त्यांच्यावर मायदेशी, आपापल्या घरी परतण्याची वेळ आली. आखाती देशांतही हीच परिस्थिती आहे. आखाती देशांचा कारभार बहुतांश दुसऱ्या देशांतून आलेल्या कामगारांच्या बळावरच चालतो.
लवकरच परिस्थिती सुधरेल, सर्वकाही रुळावर येईल व परत आपलं रुटिन सुरू होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती, पण ही आशा फोल ठरली. हातातले पैसे संपल्याने व रोजगारही गेल्यानं अनेकांवर भुके मरण्याची वेळ आली, पण आता परतीचे मार्गही बंद झाले होते. सर्वच देशांनी आपापल्या सीमाही बंद केल्या होत्या. याच परिस्थितीचा उद्रेक झाला.
कुवेतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इजिप्तचे नागरिक आहेत. कोरोनाकाळात अनेकांची छावणीमध्ये सोय केली, पण उपाशी राहण्याची वेळ येऊनही आपल्याला घरी जायला मिळत नाही म्हटल्यावर हे सारे इजिप्शिअन बिथरले व त्यांनी रस्त्यावर येऊन दंगा सुरू केला. गेले काही दिवस हा प्रकार सुरू आहे. शेवटी कुवेत सरकारनं पोलिसी बळावर हा उद्रेक शांत केला; पण इजिप्शिअन कामगार, मजुरांवर दंडे मारतानाचे कुवेत पोलिसांचे फोटो, व्हिडिओ माध्यमांवर झळकल्यावर हा प्रश्न जास्त चर्चेत आला.
अनेक इजिप्शिअन नागरिक रस्त्यावर येऊन कुठे आहे आमच्या सरकारचा दुतावास? काय करताहेत तिथली लोकं? आम्हाला मायदेशी का जाऊ देत नाही? अशा घोषणा देत गोंधळही घातला. हा प्रश्न जास्तच चिघळल्यावर स्थलांतरित मजुरांना परत मायदेशी जाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मानवतेच्या कारणावरून गोंधळ घालणाºया या इजिप्शिअन नागरिकांना तुरुंगात टाकणार नाही, असं कुवेत सरकारनं जाहीर केलं आहे. त्यांच्याकडून तिकिटाचे पैसेही न घेता त्यांना मायदेशी सोडण्यात येणार आहे. एका अभ्यासानुसार, कुवेत, बहारीन, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात या आखाती देशांत सुमारे ३५ लाख स्थलांतरित कामगार काम करतात.