Coronavirus: कोरोनाचा डेल्टा अन् ओमायक्रॉन एकत्र येऊन नवा व्हेरिएंट आला; सायप्रसच्या संशोधकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 08:37 AM2022-01-09T08:37:58+5:302022-01-09T08:38:17+5:30
कोरोनाच्या ओमायक्रॉन संकटात आता डेल्टा आणि ओमायक्रॉनचं एकत्रित असलेला ‘डेल्टाक्रॉन’(Deltacron) व्हेरिएंटचा शोध लागला आहे.
नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा जगातील अनेक देशात महामारीनं डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेने ओमायक्रॉन व्हेरिएंट कमी घातक असला तरी तो ज्या वेगाने लोकांना संक्रमित करत आहे ते पाहता बहुतांश देशात कोरोनाची लाट धडकली आहे. दिवसाला लाखो लोकं कोरोनाबाधित होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कोरोनाच्या ओमायक्रॉन संकटात आता डेल्टा आणि ओमायक्रॉनचं एकत्रित असलेला ‘डेल्टाक्रॉन’(Deltacron) व्हेरिएंटचा शोध लागला आहे. सायप्रस विद्यापीठातील जैववैज्ञानिक प्राध्यापिका लिओनडिओस कोस्ट्रिकिस यांनी डेल्टाच्या जीनोममध्ये ओमायक्रॉनचे अंश सापडल्याने त्याला डेल्टाक्रॉन असं म्हटलं आहे. रिपोर्टनुसार, संशोधकांच्या या टीमला या व्हेरिएंटचे २५ रुग्ण आढळले आहेत. या व्हेरिएंटचा धोका आणि प्रभाव कितपत असू शकेल हे सांगणं आत्ताच शक्य नाही असं कोस्ट्रिकिस यांनी सांगितले आहे.
तसेच डेल्टा आणि ओमायक्रॉन या व्हेरिएंटच्या एकत्रितपणामुळे भविष्यात आरोग्य व्यवस्थेवर ताण पडू शकतो. ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टाक्रॉनवर भारी पडू शकतो. संशोधकांनी हा रिपोर्ट GISAID कडे पाठवला आहे. जी आंतरराष्ट्रीय डेटाबेसनुसार, व्हायरस ट्रॅक करते. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा जगात झपाट्याने प्रार्दुभाव होत असल्याने डेल्टाक्रॉन व्हेरिएंट समोर येत आहे. ओमायक्रॉनमुळे सध्या कोविड रुग्णसंख्येत वेगाने वाढ होतेय.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठानुसार, यूएसमध्ये सात दिवसांची सरासरी काढली असता दिवसाला ६ लाखाहून अधिक कोविड रुग्ण आढळत आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत हा आकडा तब्बल ७२ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे तेथील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. कर्मचाऱ्यांना संसर्ग होत असल्याने पोलीस, अग्निशमन दल, बसचालक आदी सार्वजनिक सेवांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे लोकांपर्यंत आवश्यक सेवा कशा पोहोचवाव्या, असा प्रश्न सरकारसमोर निर्माण झाला आहे. बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे अनेक ठिकाणी टेस्टींग किटचा तुटवडा निर्माण झाला आहे.
कोविड रुग्णसंख्येत वाढ
गेल्या २४ तासामध्ये जगात २६.९६ लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, ६ हजार ३६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये सर्वाधिक ८.४९ लाख नवे बाधित आढळले आहेत. त्यापाठोपाठ फ्रान्समध्ये ३.२८ लाख, ब्रिटनमध्ये १.७८ लाख, स्पेनमध्ये १.१५ लाख, अर्जेंटिनामध्ये १.१० आणि इटलीमध्ये १.०८ लाख बाधितांची नोंद झाली आहे. फ्रान्समध्ये सहापटींनी रुग्णवाढ झाली असून, तेथील परिस्थिती गंभीर झाली आहे.