coronavirus: अमेरिकेत निवडणुकीआधी लसीच्या मान्यतेसाठी वाढतोय दबाव, संशोधकांना लागली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 06:24 AM2020-09-05T06:24:35+5:302020-09-05T06:25:13+5:30
अमेरिकेत फायझर व मॉडेर्ना या कंपन्यांनी लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसºया टप्प्याला २७ जुलै रोजी सुरुवात केली. या चाचण्यांसाठी ३० हजार स्वयंसेवकांची गरज लागणार असून, सध्या १५ हजार स्वयंसेवक उपलब्ध झाले आहेत.
वॉशिंग्टन : किमान एका कोरोना प्रतिबंधक लसीला अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या आधी मान्यता द्यावी, असा दबाव राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संबंधित यंत्रणांवर आणण्याची शक्यता आहे. तशी चर्चा सुरू आहे.
कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित असल्याचे प्रयोगांतून सिद्ध होण्याच्या आधीच राजकीय दबावापोटी तिला मान्यता देणे ही अत्यंत आक्षेपार्ह कृती असेल, असे तेथील संशोधकांचे मत आहे.
अमेरिकेत फायझर व मॉडेर्ना या कंपन्यांनी लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसºया टप्प्याला २७ जुलै रोजी सुरुवात केली. या चाचण्यांसाठी ३० हजार स्वयंसेवकांची गरज लागणार असून, सध्या १५ हजार स्वयंसेवक उपलब्ध झाले
आहेत.
तिसºया टप्प्यात स्वयंसेवकांना फायझर कंपनी २१ दिवसांत तर मॉडेर्ना २८ दिवसांत लसीचे दोन डोस देणार आहे. या दोन्ही कंपन्या लस विकसित करण्यासाठी एकाच प्रकारचे तंत्रज्ञान वापरत आहेत. या लसी टोचलेल्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचे दिसून आले. तरीही एवढ्या एकाच गोष्टीवरून त्या लसी कोरोनावर रामबाण उपाय आहेत, हे सिद्ध होत नाही.
निष्काळजीपणामुळे हानी झाल्याचा आरोप
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या पहिल्या कारकीर्दीच्या अखेरच्या वर्षात कोरोनामुळे हानी झाली.
ट्रम्प सरकारच्या निष्काळजीपणामुळे ही स्थिती ओढवली, असा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाने केला आहे.
त्यामुळे निवडणुकीआधी कोरोनाच्या लसीला मान्यता मिळाल्यास त्याचा राजकीय लाभ उठविता येईल, अशी रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांनी आखलेली असू शकते.