coronavirus: तोंडाला मास्क लावण्याच्या नियमाची न्यूयॉर्कमध्ये ऐशीतैशी, प्रत्येक जण काढतो सोयीचा अर्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 06:23 AM2020-05-15T06:23:46+5:302020-05-15T06:24:13+5:30
सार्वजनिक ठिकाणी जाताना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावलाच पाहिजे, असा नियम १७ एप्रिलपासून न्यूयॉर्कमध्ये लागू करण्यात आला आहे. मात्र हा नियम खरंच आवश्यक आहे का, अशी चर्चा तेथील अनेक रहिवाशांनी सुरू केली आहे.
न्यूयॉर्क : एखादा केलेला नियम न पाळणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असते. त्यात त्यांना काय भूषण वाटते ते कळत नाही. अमेरिकेमध्ये कोरोना साथीचा सर्वांत जास्त तडाखा बसलेल्या व २० हजारांहून अधिक लोकांचा बळी गेलेल्या न्यूयॉर्क शहरात असे बरेच दीडशहाणे आहेत की, जे घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावत नाहीत. हा उपाय आपला जीव वाचविण्यासाठी महत्त्वाचा आहे हे माहिती असूनही ते बेजबाबदारपणे वागत आहेत.
सार्वजनिक ठिकाणी जाताना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावलाच पाहिजे, असा नियम १७ एप्रिलपासून न्यूयॉर्कमध्ये लागू करण्यात आला आहे. मात्र हा नियम खरंच आवश्यक आहे का, अशी चर्चा तेथील अनेक रहिवाशांनी सुरू केली आहे. एरिक लेवेनथाल (३६ वर्षे) हे तोंडाला मास्क न बांधता न्यूयॉर्कमधील एका मोकळ्या रस्त्यावरून मॉर्निंग वॉकसाठी चालले होते. तेवढ्यात समोरून एक वृद्ध बाई आल्या. त्यांनी तोंडाला मास्क लावला होता. त्या बाईने एरिककडे बघितले व नापसंतीचा भाव दर्शवत मान हलविली. एरिकने मास्क न लावल्याने त्या बाई नाराज झाल्या होत्या. हा प्रसंग एरिकनेच मोठ्या अभिमानाने सांगितला.
कोरोनाच्या साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव रोखण्याकरिता फिजिकल डिस्टन्सिंगसाठी न्यूयॉर्कमध्ये प्रत्येकाने दुसºया व्यक्तीपासून किमान ६ फूट अंतर राखले पाहिजे, असा नियम आहे. मात्र त्यातून मुले व आजारी माणसांना वगळण्यात आले आहे. तोंडाला मास्क लावण्याच्या नियमाचा स्वत:ला सोयीस्कर असा अर्थ न्यूयॉर्कच्या रहिवाशांनी लावला आहे. उद्यानांत जाणारी माणसे, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीसही तोंडाला लावलेले मास्क बेलाशक काढून गप्पा मारत उभे असलेले दिसून येतात.
न्यूयॉर्कमधील कोरोनाची साथ उतरणीला लागेल तसतसे निर्बंध शिथील होत जाऊन लोक अधिक संख्येने घराबाहेर पडतील. अशा वेळी तोंडाला मास्क बांधणारे व न बांधणारे यांच्यात वादावादीचे प्रसंग वाढण्याची शक्यता आहे.