CoronaVirus News: जगात पहिली कोरोना लस रशियाने केली तयार; ब्लादमीर पुतीन यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 06:42 AM2020-08-12T06:42:22+5:302020-08-12T06:42:45+5:30
रशिया म्हणतो, दोन वर्षे राहतो या लसीचा प्रभाव; डब्ल्यूएचओ म्हणते, मान्यतेसाठी सुरक्षेचा डेटा हवाच
मॉस्को : कोरोनावर लस कोण पहिल्यांदा विकसीत करते, याची जगात स्पर्धा सुरू असतानाच रशियाचे राष्ट्रपती ब्लादमीर पुतीन यांनी लस तयार झाल्याची घोषणा के ली आहे. एवढेच नाही तर ती लस आपल्या मुलीलाही देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जगातील ही पहिली कोरोना लस आहे असा दावा त्यांनी केला आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने मात्र या लसीला मान्यता मिळण्यासाठी सुरक्षेच्या डेटाचा आढावा घेणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे.
रशियाने या लसीचे नाव ‘स्पुटनिक व्ही’ असे नाव दिले आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडूनही कोरोनावरील या लसीला मान्यता देण्यात आली आहे. या लसीच्या विकासासाठी आर्थिक मदत करणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे प्रमुख किरील दिमित्रेव्ह यांनी सांगितले की, या लसीची तिसºया टप्प्यातील चाचणी बुधवारी सुरू करण्यात आली आहे. या लसीचा प्रभाव दोन वर्ष राहतो असा दावा, रशियाच्या आरोग्य खात्यानं केला आहे. रशियाच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, ही नोंदणी सशर्त करण्यात आली आहे. या लसीचे उत्पादन सुरू असताना त्याच्या चाचण्याही सुरू ठेवण्यात येणार आहेत.
पुतीन म्हणाले, माझ्या मुलीलाही दिली लस
मंगळवारी सकाळी करोनाविरोधातील जगातील पहिल्या लसीची नोंदणी करण्यात आली आहे. ही जगासाठी आशादायी बाब आहे. लस विकसीत करण्यासाठी कष्ट घेण्यारांचा मी ऋणी आहे.
ही लस सगळ््या आवश्यक चाचण्यांमधून यशस्वी झाली आहे. ही लस प्रभावी आहे. या लसीमुळे रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात निर्माण होते. माझ्या दोनपैकी एका मुलीला ही लस देण्यात आली आहे. तिची तब्येतही उत्तम आहे. लवकरच देशात या लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येणार आहे.
या लसीला डब्ल्यूएचओने मान्यता दिली का?
अजून या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळालेली नाही. त्याबाबत डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, कोणत्याही लसीला मान्यता देण्यासाठी सुरक्षेसंदर्भातील माहितीचा आढावा घेणे गरजेचे असते. लसीच्या उत्पादनासाठी ती सुरक्षित असल्याचा डब्ल्यूएचओचा ‘स्टॅम्प’ आवश्यक असतो.
165 प्रकारच्या लसींवर सध्या काम सुरू आहे.
139 लसी सध्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात आहेत.
26 लसींची सध्या मानवावर चाचणी
06लसींची (वरील २६ पैकी) मानवावर तिसºया टप्प्याची चाचणी सुरू आहे.
रशियन लसीसाठी भारतीयांना करावी लागणार प्रतीक्षा
नवी दिल्ली : रशियन लसीसाठी भारतीयांना मात्र प्रतीक्षा करावी लागेल. केंद्र सरकारने लस विकसित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीला परदेशी लस स्वदेशात आणण्यासंबंधी निर्णयाचे अधिकार असतात व याच समितीची बैठक बुधवारी होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. रशियन लसीचा थेट उल्लेख करण्याचे त्यांनी टाळले.