coronavirus: रशियाचे अजून एक पाऊल पुढे, ऑगस्टच्या मध्यापर्यंत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करणार कोविड-१९ वरील लस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 11:52 AM2020-07-29T11:52:58+5:302020-07-29T11:55:50+5:30
काही दिवसांपूर्वीच कोरोनाविरोधातील लस विकसित केल्याचा दावा केल्यानंतर आता रशियाने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे.
नवी दिल्ली/मॉस्को - संपूर्ण जग कोरोना विषाणूविरोधात संपूर्ण जग लढत असतानाच काही ठिकाणांवरून कोरोनाविरोधातील लढ्याला बळ देणाऱ्या बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वीच कोरोनाविरोधातील लस विकसित केल्याचा दावा केल्यानंतर आता रशियाने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. कोरोनाविरोधातील लसीची चाचणी यशस्वी ठरल्यानंतर आता ऑगस्टच्या मध्यापर्यंत ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी रशियाने केली आहे.
रशियन सरकार दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळेत जगातील सर्वात पहिल्या कोरोनावरील लसीला मंजुरी देऊ शकते. ही माहिती सीएनएनने आपल्या वृत्तात दिली आहे. या लसीबाबत रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले. की, कोरोनावरील लसीला मंजुरी देण्यासाठी १० ऑगस्ट किंवा त्यापूर्वीच्या तारखेवर काम करण्यात येत आहे. ही लस मॉस्कोमधील गमलेया इंस्टिट्युटने विकसित केली आहे.
आता ही लस सर्वसामान्यांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगिले. तसेच ही लस सर्वप्रथम फ्रंटलाइन हेल्थकेअर वर्कर्सना देण्यात येईल. रशियाने कोरोनावरील लस विकसित केल्याचा दावा केला असला तरी या लसीबाबतचा कुठलाही डेटा प्रसिद्ध केलेले नाही. त्यामुळे या लसीच्या उपयुक्ततेबाबत कुठल्याही प्रकारचे विधान करता येणार नसल्याचे संशोधकांचे मत आहे.
कोरोनावरील लस लवकरात लवकर तयार करण्यासाठी रशियामध्ये राजकीय दबाव आणण्यात येत असून, रशियाला संशोधनक्षेत्रातील शक्ती म्हणून पुढे आणण्यासाठी राजकीय नेतृत्व उत्सुक आहे. दरम्यान, रशियात विकसित करण्यात आलेल्या लसीच्या अपूर्ण चाचण्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, कोरोनावरील शेकडो लसींवरील चाचणी सध्या जगभरात चालू आहे. काही देशांमधील चाचण्या ह्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र रशियामधील लसीचा दुसरा टप्पा पार होणेही अद्याप बाकी आहे. दरम्यान, लस विकसित करणाऱ्यांनी ३ ऑगस्टपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होईल.
कोरोनावरील लस लवकर विकसित करण्यात यश मिळाले कारण ही लस अशा प्रकारच्या आजारांशी लडण्यात आधीपासून सक्षम होती, अशा दावा संशोधकांनी केला आहे.