Coronavirus: रशिया, पाकिस्तानमध्ये एका दिवसात रुग्णसंख्येत झाली मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 11:16 PM2020-05-02T23:16:30+5:302020-05-03T06:42:58+5:30
आरोग्ययंत्रणेवर मोठा ताण । निर्बंधांचे नीट पालन होण्याची गरज
मॉस्को/इस्लामाबाद : जगातील काही देश लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना रशिया व पाकिस्तानमध्ये शुक्रवारी एका दिवसात ‘कोविड-१९’ रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.
रशियामध्ये शुक्रवारी एका दिवसात ९,६३३ तर पाकिस्तानमध्ये १,२९७ रुग्ण आढळून आले. रशियामध्ये आता एकूण रुग्णांची संख्या १ लाख २४ हजारहून अधिक झाली आहे. तर तिथे बळींची संख्या सव्वा हजारावर पोहोचली आहे. याच गतीने कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत राहिली तर त्या देशातील रुग्णालयांवर मोठा ताण येणार आहे. रशियामध्ये काही दिवसांत वैद्यकीय साधनांचा तुटवडाही जाणवू लागण्याची शक्यता आहे. नजिकच्या काळातील हे संकट दिसत असल्यामुळे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक करण्याचे ठरविले आहे. रशियात अन्य दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी रुग्णांची संख्या २० टक्क्यांनी वाढली. या देशात रुग्णांपैकी सुमारे १५ हजार जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत.
पाकिस्तानमध्ये शुक्रवारी १,२९७ नवे रुग्ण आढळून आल्याचे तेथील सरकारने सांगितले. त्यामुळे तेथील एकूण रुग्णांची संख्या १८ हजारवर गेली आहे. शुक्रवारी पाकिस्तानमध्ये ९ हजार लोकांची चाचणी करण्यात आली. त्यात अनेक नवे रुग्ण आढळले असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले. पाकिस्तानातदररोज वीस हजार लोकांच्या चाचण्या करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे असेही ते म्हणाले.
फिजिकल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
पाकिस्तानमधील लोक फिजिकल डिस्टन्सिंगची बंधने कमी प्रमाणात पाळताना दिसत आहेत. या देशात ठिकठिकाणच्या प्रार्थनास्थळांमध्ये शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र दिसले होते.