Coronavirus: कोरोनापासून दूर पळाले, पण तोच जवळ आला; पवित्र पाणी प्यायल्याने कोरोना झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 08:56 PM2020-03-17T20:56:44+5:302020-03-17T20:58:04+5:30
Coronavirus चर्चमधलं पवित्र पाणी प्यायल्यानं ४६ जणांना कोरोनाची लागण
सेऊल: सध्या जगात सर्वत्र कोरोनाची दहशत पाहायला मिळतेय. आतापर्यंत ७ हजारांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर जवळपास पावणे दोन लाख लोकांवर उपचार सुरू आहेत. सगळ्यांनीच कोरोनाचा धसका घेतलाय. मात्र अद्याप यावर कोणतीही लस सापडलेली नाही. सध्या शास्त्रज्ञांकडून यावर संशोधन सुरूय. मात्र सध्या तरी त्यांच्या हाती यश आलेलं नाही. मात्र कोरोना पळवण्याचा दावा करत अनेक जण उपाय सुचवत आहेत आणि काही जण त्यावर विश्वासदेखील ठेवत आहेत. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये असाच एक प्रकार घडलाय.
दक्षिण सेऊलमध्ये असलेल्या गेऑन्जी प्रांतात रिव्हर ऑफ ग्रेस कम्युनिटी चर्चमधल्या एका महिला कर्मचाऱ्यानं बाटलीच्या नोझलमधून (नळीसारखा ड्रॉपर) भाविकांच्या तोंडामध्ये मिठाचे पाणी टाकले. हे पवित्र पाणी असून त्यामुळे कोरोना होणार नाही, असा दावा संबंधित महिलेनं केला. भाविकांनीदेखील त्यावर विश्वास ठेवला. मात्र या पवित्र पाण्यामुळे ४६ जणांना कोरोनाची बाधा झाली. या वृत्ताला स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनीदेखील दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे या ४६ जणांमध्ये चर्चचे मुख्य धर्मोपदेशक आणि त्याच्या पत्नीचाही समावेश आहे.
एक ते आठ मार्चदरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये महिला कर्मचारी भाविकांच्या तोंडात मिठाचं पाणी टाकत असल्याचं स्पष्ट दिसतंय. ‘त्या महिलेनं स्प्रेसाठी वापरली जाणारी बाटली वापरली होती. भाविकांच्या तोंडात पाणी टाकताना महिलेनं बाटलीचं नोझलच त्यांच्या तोंडात टाकलं. त्यामुळेच भाविकांना कोरोनाची बाधा झाली,’ अशी माहिती कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाच्या प्रमुखांनी दिली.
चर्चमधील महिला कर्मचारी बाटलीतून देत असलेलं पाणी पवित्र असून त्यामुळे कोरोनाचा विषाणू मरेल, या श्रद्धेनं सर्व भाविक ते पाणी प्यायले, अशी माहिती कृती दलाच्या प्रमुखांनी दिली. यानंतर लगेचच चर्च बंद करण्यात आलं. याशिवाय चर्चमधील प्रार्थनेला उपस्थित राहिलेल्या सर्वांची तपासणीदेखील सुरू करण्यात आली. दक्षिण कोरियामध्ये आठ हजाराहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.