कोरोना धोकादायक होतोय! आता थेट मेंदूवर हल्ला करतोय; शास्त्रज्ञांकडून गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 12:24 PM2020-07-08T12:24:47+5:302020-07-08T12:25:58+5:30

कोरोना विषाणूचा धोका वाढत असल्याची माहिती संशोधनातून समोर

CoronaVirus Scientists warn of potential wave of Covid linked brain damage | कोरोना धोकादायक होतोय! आता थेट मेंदूवर हल्ला करतोय; शास्त्रज्ञांकडून गंभीर इशारा

कोरोना धोकादायक होतोय! आता थेट मेंदूवर हल्ला करतोय; शास्त्रज्ञांकडून गंभीर इशारा

googlenewsNext

लंडन: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा जवळपास सव्वा कोटींच्या जवळ पोहोचला आहे. यातील ७० लाख रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे. मात्र आता कोरोना अधिकाधिक धोकादायक होत असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे.

कोरोनाचा विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे श्वासोच्छवासात समस्या निर्माण होते. मात्र आता कोरोना थेट मेंदूवर हल्ला करेल, अशा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. कोरोना विषाणूमुळे मेंदूशी संबंधित विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो, अशी धोक्याची सूचना युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील (यूएलसी) संशोधकांनी दिली आहे. यूएलसीमधील संशोधकांनी ४३ कोरोना रुग्णांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या रुग्णांना स्ट्रोक, मेंदू आणि मज्जातंतूंच्या आजारांचा सामना करावा लागत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे. 

कोरोनामुळे मेंदूला धोका पोहोचत असल्याचं संशोधकांनी सांगितलं. 'कोरोनामुळे निर्माण झालेला धोका १९२० आणि १९३० च्या दशकात आलेल्या महामारीसारखा आहे का, याबद्दल संशोधन सुरू आहे,' अशी माहिती यूसीएलच्या न्युरोलॉजी विभागाच्या मायकल झंडी यांनी दिली. कोरोनाचा मेंदूवरील परिणामांचा अभ्यास करणाऱ्या पथकात झंडी यांनी उपप्रमुख म्हणून काम केलं आहे.

कोरोना विषाणू फुफ्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला श्वास घेण्यात अडचणी येतात. मात्र आता कोरोना मेंदूवरही परिणाम करत असल्याचं पुरावे शास्त्रज्ञांना सापडू लागले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. 'सध्या जगातील लाखो लोक कोरोनाबाधित आहेत. पुढील वर्षभरात हे लाखो जण बरे होतील. या व्यक्तींच्या मेंदूवर परिणाम झाल्यास त्यांच्या शारीरिक क्षमता बाधित होतील. त्यामुळे त्यांना दैनंदिन कामं करताना अडचणी येतील,' अशी माहिती कॅनडा विद्यापीठातील न्युरो शास्त्रज्ञ ऍड्रियन ओवेन यांनी दिली.
 

Web Title: CoronaVirus Scientists warn of potential wave of Covid linked brain damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.