CoronaVirus : धक्कादायक! फ्रान्समध्ये कोरोनामुळे एका दिवसात ४९९ लोकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 08:39 AM2020-04-01T08:39:14+5:302020-04-01T08:40:23+5:30
CoronaVirus : कोरोनामुळे आतापर्यंत सर्वाधिक लोकांचा मृत्यू इटलीत झाला आहे.
पॅरिस : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. इटली, स्पेन, अमेरिकेनंतर कोरोनामुळे फ्रान्समध्ये जास्त प्रमाणात लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी एका दिवसात सर्वाधिक ४९९ लोकांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत फ्रान्समध्ये कोरोनामुळे ३५२३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाचे अधिकारी जेरॉम सॉलोमन यांनी सांगितले की, "फ्रान्समध्ये कोरोनाची लागण झालेल्या २२७५७ लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामधील ५५६५ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. जास्तकरून लोकांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये झाला आहे."
कोरोनामुळे आतापर्यंत सर्वाधिक लोकांचा मृत्यू इटलीत झाला आहे. इटलीमध्ये १२ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १०५७९२ लोकांचा कोरोनाची बाधा झाली आहे. इटलीनंतर कोरोनामुळे सर्वाधिक स्पेनमध्ये लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये एका दिवसात कोरोनामुळे ३८१ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ब्रिटमधील एक दिवसाचा हा आकडा सर्वाधिक आहे. आतापर्यंत याठिकाणी १७८९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात जवळपास ८२८०६१ लोकांना कोरानाची लागण झाली आहे. तर ४१२६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारतात सुद्धा दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. तसेच, केंद्र आणि राज्य सरकारडून कोरोनावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. देशात कोरोनाचे १६११ रुग्ण असून, ४७ जणांचा मृत्यू झाला आहे.