Coronavirus: Shocking ! अमेरिकेत २४ तासांत ८६५ बळी, कोरोनाग्रस्त मृतांची संख्या दुप्पटीने वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 12:18 PM2020-04-01T12:18:31+5:302020-04-01T12:21:28+5:30
अमेरिकेतील मृतांचा आकडा झपाट्याने वाढत असून मृतांची संख्या ४ हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. जॉन हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील मृतांची संख्या ४०७६ वर पोहोचली आहे,
वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. इटली, स्पेन, अमेरिकेनंतर कोरोनामुळे फ्रान्समध्ये जास्त प्रमाणात लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी एका दिवसात सर्वाधिक ४९९ लोकांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत फ्रान्समध्ये कोरोनामुळे ३५२३ लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, गेल्या २४ तासात अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूंमध्ये दुप्पटीने वाढ झाल्याचं दिसून येतंय. गेल्या २४ तासात अमेरिकेत तब्बल ८६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेतील मृतांचा आकडा झपाट्याने वाढत असून मृतांची संख्या ४ हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. जॉन हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील मृतांची संख्या ४०७६ वर पोहोचली आहे, जी शनिवारी नोंद करण्यात आलेल्या मृतांच्या आकडेवारीपेक्षा दुप्पट आहे. अमेरिकत शनिवारी मृतांचा आकडा २०१० एवढा होता. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांत या आकड्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. व्हाईट हाऊसचे समन्वयक डेबोराह बीरक्स यांनी पत्रकारांना माहिती देताना, अमेरिकेत १ लाख ते २ लाख नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली आहे. तसेच, आम्ही दररोज परिस्थिती नियंत्रणात आणण्यसाठी सर्वाधिक प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, "फ्रान्समध्ये कोरोनाची लागण झालेल्या २२७५७ लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामधील ५५६५ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. जास्तकरून लोकांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये झाला आहे." कोरोनामुळे आतापर्यंत सर्वाधिक लोकांचा मृत्यू इटलीत झाला आहे. इटलीमध्ये १२ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १०५७९२ लोकांचा कोरोनाची बाधा झाली आहे. इटलीनंतर कोरोनामुळे सर्वाधिक स्पेनमध्ये लोकांचा मृत्यू झाला आहे.