Coronavirus: 4 मे रोजी संपणारा लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवला; सिंगापूर सरकारचं सावध पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 06:24 PM2020-04-21T18:24:15+5:302020-04-21T18:24:44+5:30
सिंगापूर सरकारने लॉकडाऊन 1 जूनपर्यंत सुरू राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.
सिंगापूरः कोरोना विषाणूनं जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. तरीसुद्धा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अनेक देशांना शक्य झालेलं नाही. त्याच पार्श्वभूमीवर सिंगापूरमधील लॉकडाऊन पुढील चार आठवड्यांसाठी वाढविण्यात आले आहे. सिंगापूर सरकारने लॉकडाऊन 1 जूनपर्यंत सुरू राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. मंगळवारी सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग म्हणाले की, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे.
सिंगापूरमध्ये कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर तिथलं सरकार लागलीच सक्रिय झालं होतं. सरकारने तातडीने शाळा व इतर कामे सुरू असलेली ठिकाणं बंद केली होती. त्यामुळे सिंगापूरमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला नाही. 2 आठवड्यांपूर्वी लादलेला लॉकडाऊन 4 मे रोजी संपणार होता. परंतु आता सिंगापूर सरकारनं तो 1 जूनपर्यंत वाढविला आहे.
द गार्डियनच्या वृत्तानुसार, सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने संसर्गाची ताजी माहिती जाहीर केल्यानंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात आला. सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गाची 1,111 नवीन प्रकरणे समोर आली असून, संक्रमितांची संख्या वाढून 9,125वर पोहोचली आहे. कोरोना संक्रमित नवे रुग्ण हे वसतिगृहात राहणा-या स्थलांतरित मजुरांमध्ये आढळले आहेत. आम्हाला प्रवासी मजुरांवर विश्वास असल्याचंही सिंगापूर सरकारनं स्पष्ट केलं आहे.
सिंगापूरमध्ये मोठ्या संख्येने बांधकाम मजूर आशियाई देशांमधून येतात. सिंगापूरच्या बांधकाम क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. अलीकडच्या काळात कामगारांच्या राहत्या वसतिगृहात संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या काळात येथे काही डझनभर मजुरांना संसर्ग झाल्याची नोंद होती. गेल्या आठवड्यात त्यांची संख्या शेकडोंवर गेली आहे. सिंगापूरमध्ये सलग दोन दिवस संक्रमितांची नवी प्रकरणे हजारांच्या पुढे जात आहेत. आग्नेय आशियातील देशांमधील सिंगापूरमध्ये कोरोना संक्रमितांचे प्रमाण सर्वाधिक आहे.