coronavirus: कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी लागतील तब्बल एवढी वर्षे, बिल गेट्स यांनी केला मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 11:15 PM2021-03-25T23:15:53+5:302021-03-25T23:17:06+5:30
Bill Gates big claims about coronavirus : गेल्या वर्ष सव्वा वर्षाच्या काळात कोरोनामुळे जगभरात २७ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जगातील अनेक देशांनी कोरोनावरील लस विकसित केली आहे.
वॉशिंग्टन - डिसेंबर २०१९ मध्ये चीनमधील वुहान येथून कोरोनाच्या फैलावास सुरुवात झाली होती. (coronavirus ) तेव्हापासून आतापर्यंत कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. गेल्या वर्ष सव्वा वर्षाच्या काळात कोरोनामुळे जगभरात २७ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जगातील अनेक देशांनी कोरोनावरील लस विकसित केली आहे. मात्र आतापर्यंत कुणालाही ही महामारी कधीपर्यंत संपुष्टात येईल, हे कुीच सांगू शकलेला नाही. आता कोरोनाची साथ कधीपर्यंत संपुष्टात येईल, याबाबत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी मोठा दावा केला आहे. ( The situation created by the corona will return to normal by end of 2022, Bill Gates claims)
पोलंडमधील प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बिल गेट्स म्हणाले की, कोविड-१९ च्या ज्या लसी विकसित झाल्या आहेत. त्यामुळे २०२२ च्या अखेरीस जगातील परिस्थिती पूर्वपदावर यायला पाहिजे. कोरोनाची साथ ही एक अविश्वसनीय आपत्ती आहे. मात्र या चिंतेच्या काळात एकच दिलासादायक बाब आहे ती म्हणजे कोरोना विषाणूवरील लस कोरोनाबाबत बिल गेट्स यांचे हे वक्तव्य खूप महत्त्वपूर्ण मानले जात आहे. कारण बिल गेट्स हे याबाबत सुरुवातीपासून तज्ज्ञांच्या संपर्कात आहेत. तसेच लस विकसित करण्यासाठी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सद्यस्थितीचा विचार केल्यास जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही १२ कोटी ५५ लाख ८९ हजार ४६४ एवढी झाली आहे. त्यापैकी २७ लाख ५९ हजार २४६ लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. अमेरिका हा कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झालेला देश असून, तिथे सुमारे ३ कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ब्राझीलमध्ये आतापर्यंत १ कोटी २२ लाख कोरोना रुग्ण सापडले आहेत. १ कोटी १७ लाख रुग्णांसह भारत या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र भारतामध्ये कोरोनावरील दोन लसींना परवानगी मिळाली असून, देशात कोरोनावरील लसीकरणाला वेगाने सुरुवात झाली आहे.