CoronaVirus: विषाणू उन्हात फार काळ टिकत नाही; अमेरिकन संशोधकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 04:33 AM2020-04-25T04:33:23+5:302020-04-25T06:58:01+5:30
एक ते दीड मिनिटच तग धरु शकतो
वॉशिंग्टन : कोरोना विषाणू उन्हामधे फारतर एक ते दीड मिनिटच तग धरु शकतो असा दावा अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे. फ्लू साथीसारखा कोरोना उन्हाळ्यात फार प्रसार पावणार नाही, असेही संशोधकांचे म्हणणे आहे. मात्र, या संशोधनाला आणखी पुष्टी देण्यासाठी काही चाचण्या करण्यात येणार असून, त्यावर तज्ज्ञांची मते देखील जाणून घेतली जातील. त्या नंतरच संशोधन अहवाल सर्वांसाठी खुला केला जाणार आहे.
कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. औषध कंपन्यांसर विविध संशोधकही विषाणूला जाणून घेण्यासाठी अनेक प्रयोग करीत आहेत. अमेरिकेतील होमलँड सेक्युरिटीचे सचिव विल्यम ब्रायन म्हणाले, अल्ट्राव्हॉयलेट किरणांचा कोरोनावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उन्हामधे त्याचा प्रसार फारसा वेगाने होणार नाही. सौर किरणांमुळे हवेतील आणि जमिनीवर अथवा रस्त्यावर पडलेले विषाणू देखील फारकाळ तग धरु शकत नाही. केवळ तापमानच नाही तर आद्रता देखील वाढल्यास विषाणू तगून राहण्याचा कालावधी कमी होत आहे. अल्ट्राव्हॉयलेट किरणांमुळे विषाणूचे संरक्षक आवरण कमकुवत होते. तसेच, स्वत:ची संख्या वाढविण्याची त्याची क्षमता नष्ट होते.
टेक्सास विद्यापीठातील जैवशास्त्रज्ञ विभागाचे प्रमुख बेंजामिन न्युमन म्हणाले, कोरोनावर सौर किरणांचा आणि आद्रतेचा होणारा प्रभाव तपासण्यासाठी त्यांनी नक्की चाचणी कशी केली, त्याचे परिणाम कसे मोजले हे पहावे लागेल.
ऑस्ट्रेलिया सारख्या देशांचा विचार केल्यास तेथे बाधितांची संख्या ७ हजार असून, ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तरेकडील थंड प्रदेशामधे हवेमधे विषाणू अधिक काळ राहण्याचे प्रमाण जास्त आहे. उष्ण तापमानात विषाणूचे संरक्षक कवच तुलनेने लवकर नष्ट होत आहे. त्यामुळे उन्हाळ््यात बाधितांची संख्या घटेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
तापमान २१ ते २४ सेल्सिअस असल्यास आणि जमीन अथवा किठीण वस्तूची आद्रता २० टक्के असल्यास विषाणूचे अर्ध आयुष्य १८ तासावर खाली येते. आद्रता ८० टक्के झाल्यास अर्ध आयुष्य ६ तासांवर खाली येते. सौरतापमानात तर एक ते दीड मिनिटेच विषाणू तग राहू शकतो. उन्हाळ्यासारखे वातावरण तयार करुन विषाणूवर होणारा परिणाम आम्ही तपासला. मात्र, याचा अर्थ असा नाही की उन्हामुळे पूर्णपणे विषाणूचा नायनाट होईल. नागरिकांना कोरोनाच्या मार्गदर्शक सूचना या पाळाव्याच लागतील.
- विल्यम ब्रायन,
सचिव, होमलँड सेक्युरिटी, अमेरिका