Coronavirus: ज्या व्यक्तीमुळे पसरला कोरोना, तो अखेर सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 07:58 AM2020-02-15T07:58:53+5:302020-02-15T08:01:48+5:30
स्टिव्ह वॉल्श यांच्या माध्यमातून अनेकांना कोरोनाची बाधा
लंडन: ब्रिटनमध्ये एका व्यक्तीचा कसून शोध घेतला जात होता. ही व्यक्ती कोणी अंडरवर्ल्ड डॉन किंवा गुन्हेगार नव्हती. तर या व्यक्तीवर कोरोना विषाणू पसरवल्याचा संशय होता. अखेर ही व्यक्ती सापडली. स्टिव्ह वॉल्श (वय ५३ वर्षे) असं या व्यक्तीचं नाव असून ती पेशानं व्यवसायिक आहे. स्टिव्ह यांच्यावर लंडनमधल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्टिव्ह पूर्णपणे बरे झाले असले, तरी त्यांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस अनेक देशांमध्ये पोहोचला आहे.
स्टिव्ह जानेवारीत ब्रिटनमधील गॅस अॅनलिटिक्स कंपनी सर्वोमॅक्सच्या विक्री परिषदेला गेले होते. तिथेच त्यांना कोरोना व्हायरसची बाधा झाली. या परिषदेला उपस्थित असलेल्या चिनी शिष्टमंडळाकडून कोरोना व्हायरस पसरला असावा, अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त करण्यात आली होती. मात्र या शिष्टमंडळाची वैद्यकीय चाचणी निगेटिव्ह होती, अशी माहिती सर्वोमॅक्सनं दिली. यानंतर सर्वोमॅक्सनं स्टिव्ह यांचा फोटो प्रसिद्ध केला. स्टिव्ह यांच्या माध्यमातून कोरोना अनेक देशांत पसरल्यानं त्यांना 'सुपर स्प्रेडर' म्हटलं गेलं.
स्टिव्ह यांच्याकडून कसा पसरला कोरोना?
सिंगापूरमधल्या आलिशान हृयात हॉटेलमध्ये आयोजित परिषदेला १०९ प्रतिनिधी हजर होते. त्याठिकाणी काही चिनी नृत्यांगनांनी त्यांची कला सादर केली. परिषदेला उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी याचा आनंद घेतला. आपण एका भयंकर, जीवघेण्या व्हायरसच्या संपर्कात आहोत, याची पुसटशीही कल्पना उपस्थितांना नव्हती. या परिषदेहून मलेशियाला परतलेल्या एका व्यक्तीच्या शरीरात कोरोना विषाणू आढळला. यानंतर परिषदेला उपस्थित असलेल्या इतर सर्व लोकांना वेगळ्या ठिकाणी ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र तोपर्यंत १०९ पैकी ९४ जण मायदेशी परतले होते. त्यामुळे जीवघेणा कोरोना विषाणू पसरत गेला.
सिंगापूरमधल्या परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेले दक्षिण कोरियाचे दोन जण मलेशियन व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांच्या माध्यमातून कोरोना विषाणू दोन नातेवाईकांच्या शरीरात पसरला. परिषदेला उपस्थित राहिलेल्या आणखी तिघांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती यानंतर समोर आली. युरोपमध्येही कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याची माहिती पुढे आली. या परिषदेला स्टिव्ह वॉल्श उपस्थित होते.
परिषद संपल्यानंतर स्टिव्ह पत्नीसोबत फ्रान्समध्ये सुट्टीवर गेले. त्याआधी त्यांच्या संपर्कात आलेल्या ब्रिटनमधल्या चार मित्रांना कोरोनाची बाधा झाली होती. फ्रान्समध्ये सुट्टी घालवत असताना स्टिव्ह यांनी जेट स्कीचा आनंद घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत ब्रिटनमधलेच पाच जण होते. त्यांच्या शरीरातही कोरोनाच्या विषाणूनं प्रवेश केला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्टिव्ह यांच्या संपर्कात आल्यानं एका स्पॅनिश नागरिकालादेखील कोरोनाची बाधा झाली. ही व्यक्ती स्पेनमध्ये परतल्यानं ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. वॉल्श यांच्या माध्यमातून ११ जणांना कोरोना झाला.