CoronaVirus News: कोरोनाला रोखून दाखवलं! 'या' देशात २०० दिवसांत एकाही रुग्णाची नोंद नाही

By कुणाल गवाणकर | Published: October 30, 2020 12:10 PM2020-10-30T12:10:32+5:302020-10-30T12:13:32+5:30

CoronaVirus News: देशात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ५५३ रुग्ण आढळले; सात जणांचा मृत्यू

CoronaVirus Taiwan marks 200 days without domestic COVID 19 infection | CoronaVirus News: कोरोनाला रोखून दाखवलं! 'या' देशात २०० दिवसांत एकाही रुग्णाची नोंद नाही

CoronaVirus News: कोरोनाला रोखून दाखवलं! 'या' देशात २०० दिवसांत एकाही रुग्णाची नोंद नाही

Next

तैपेई: भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत आहे. दिवसभरात आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या तीन आठवड्यांपासून घसरत आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ६ लाखांच्या खाली आली आहे. मात्र युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच फ्रान्स आणि जर्मनीमधील परिस्थिती बिघडली आहे. दोन्ही देशांनी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अमेरिकेतही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.



जगातील बडे देश कोरोना संकटामुळे हैराण झालेले असताना तैवाननं मात्र कोरोनावर विजय मिळवला आहे. तैवानमध्ये गेल्या २०० दिवसांत एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. तैवानमध्ये १२ एप्रिलला कोरोनाचा शेवटचा रुग्ण सापडला. त्यानंतर देशात एकाही कोरोना रुग्णाची नोंद झालेला नाही. त्यामुळे भल्याभल्या देशांना न जमलेली कामगिरी तैवाननं करून दाखवली आहे. 



तैवानची लोकसंख्या सव्वा दोन कोटी इतकी आहे. आतापर्यंत देशात कोरोनाचे एकूण ५५३ रुग्ण आढळून आले. तर सात जणांचा मृत्यू झाला. आसपासच्या देशांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येताच तैवाननं तातडीनं प्रवासावर निर्बंध लादले. त्याचा परिणाम लगेचच दिसला. यासोबतच देशात मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू करण्यात आलं. कोरोना रुग्ण शोधण्यासाठी चाचण्या सुरू करण्यात आल्या. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर तातडीनं उपचार सुरू झाले. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्वरित शोधून काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली.

कोरोनाला रोखणाऱ्या तैवानची जगभरातून दखल घेतली गेली आहे. जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी तैवानचं कौतुक केलं आहे. अमेरिकेतील खासदार बर्नी सँडर्स यांनी ट्विट करून तैवानवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. 'त्यांनी हे कसं काय केलं? त्यांनी विज्ञानावर विश्वास ठेवला,' असं सँडर्स यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
 

Web Title: CoronaVirus Taiwan marks 200 days without domestic COVID 19 infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.