Coronavirus : चक्क ८५ हजार कैद्यांना केले तात्पुरते मुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 08:08 PM2020-03-17T20:08:39+5:302020-03-17T20:11:32+5:30
Coronavirus : कारागृहातून तात्पुरते मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांपैकी ५० टक्के कैद्यांना सुरक्षेसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये जेरबंद करण्यात आले होते.
दुबई - संपूर्ण जगभरामध्ये पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे उपाययोजना आखल्या आहेत. चीन देशातून फैलाव झालेल्या कोरोनाचा सर्वाधिक फटका इराणला बसला आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी चक्क ८५ हजार कैद्यांना कारागृहातून तात्पुरते मुक्त केलं आहे. देशातील कायदा आणि न्यायव्यवस्थेसंदर्भातील प्रवक्ते गोल्हामुसेन इस्मायली यांनी ही माहिती दिली आहे.
कारागृहातून तात्पुरते मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांपैकी ५० टक्के कैद्यांना सुरक्षेसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये जेरबंद करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कारागृहात होऊ नये, पसरू नये म्हणून या कैद्यांना मुक्त करण्यात आले आहे. पूर्ण काळजी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार काद्यासंदर्भातील नियुक्त अधिकारी जावेद रेहमान यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राजकीय नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आलेल्यांची तात्पुरती सुटका करावी अशी मागणी सरकारकडे केली होती. रेहमान यांची मागणी मान्य करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ७० हजार कैद्यांची तात्पुरती सुटका करण्यात आली.
इराणमध्ये कोरोनाची बाधा १४ हजार ९०० हून अधिक झाली आहे. तसेच कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ८५३ इतकी आहे. याच पार्श्वभूमीवर क्षमतेपेक्षा अधिक कैदी असणाऱ्या तुरुंगात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कैद्यांना तात्पुरत्या स्वरुपात मुक्त करण्यात आलं आहे. इराणने नुकतेच १२ कैदी असलेल्या राजकारण्यांची सुटका केली असून प्रमुख राजकीय नेते जे कैदी आहेत त्यांना मात्र तुरुंगातच ठेवण्यात आले आहे.