Coronavirus: लसीकरणानंतरही अमेरिकेचं टेन्शन वाढलं; अति दक्षता विभाग कोरोना रुग्णांनी भरले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 07:40 AM2021-10-04T07:40:26+5:302021-10-04T07:40:49+5:30
आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची टंचाई, सरकारी आकडेवारीनुुसार पूर्ण लसीकरण झालेली पाच राज्ये ही न्यू इंग्लंडमधील आहेत
वॉशिंग्टन : अमेरिकेत लसीकरणाचा सर्वोच्च वेग असूनही कोविड-१९ चा डेल्टा व्हेरिएंट किती घातक आहे याचा अनुभव न्यू इंग्लंड राज्यांच्या बहुतेक भागांत येत आहे. या भागातील अति दक्षता विभाग रुग्णांनी भरून गेले असून आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची टंचाई जाणवत आहे. त्याचा परिणाम रुग्ण सेवेवर होतो आहे. ज्यांनी कोरोना विषाणू प्रतिबंधक लस घेतली नाही त्यांनी ती लवकर घ्यावी, असे आवाहन अधिकारी करीत आहेत.
“आमच्यासाठी हे सगळे निराशाजनक आहे”, असे व्हरमाँट डिपार्टमेंट ऑफ फिनान्शियल रेग्युलेशनचे आयुक्त मायकेल पिसियाक म्हणाले. पिसियाक यांच्याकडे राज्यातील कोविड-१९ च्या आकडेवारीवर लक्ष ठेवण्याचे काम आहे. शाळांमध्ये मुले सुरक्षित राहिली पाहिजेत, असे आम्हाला वाटते. न्यू इंग्लडच्या काही भागांत कोरोनाचे विक्रमी रुग्ण नोंदले जात आहेत. न्यू इंग्लंडमधील अधिकारी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होईल यासाठी खूप प्रयत्न करीत आहेत. ९० टक्क्यांच्या वर लसीकरण करण्याची गरज आहे, असे आराेग्य विभागाचे कार्यकारी संचालक टॉम मॅकार्थी म्हणाले.
न्यू इंग्लंडमध्ये काय आहे परिस्थिती?
सरकारी आकडेवारीनुुसार पूर्ण लसीकरण झालेली पाच राज्ये ही न्यू इंग्लंडमधील आहेत. अमेरिकेत लसीकरणाची टक्केवारी उच्च असून देशाचे सरासरी लसीकरण ५५.५ टक्के आहे. न्यू इंग्लंडमध्ये हजारो लोक असे आहेत की, या ना त्या कारणाने त्यांनी लस घेतलेली नाही. ७० टक्के लसीकरण झाले तर महामारीला रोखण्यास पुरेसे आहे, असे ठासून सांगितले जात होते.