कोरोनाचा गैरफायदा घेऊन दहशतवादी मोठा जैविक हल्ला करण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 02:35 PM2020-04-10T14:35:46+5:302020-04-10T14:40:20+5:30
कोरोना विषाणूच्या फैलावाचा गैरफायदा घेऊन दहशतवादी संघटना मोठा जैविक हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
न्यूयॉर्क - चीनमधून पसरण्यास सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा फैलाव आता जगभरातील दोनशेहून अधिक देशात झाला आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा सातत्याने वाढताना दिसत आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या फैलावाचा गैरफायदा घेऊन दहशतवादी संघटना मोठा जैविक हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांनी दहशतवाद्यांच्या कटकारस्थानाबाबत ही भीती व्यक्त केली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे झालेल्या बैठकीस एंटोनियो गुटोरेस यांनी संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले की, 'कोरोना विषाणूमुळे उदभवलेल्या साथीचा सामना करताना दिसलेला कमकुवतपणा आणि अपुरी तयारी यामुळे दहशतवाद्यांना एक संधी मिळाली आहे. तसेच त्यांच्याकडून जैविक हल्ला होण्याचा धोका वाढला आहे. सध्या जगभरातील सर्वच देशांनी कोरोनाविरोधात लढण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. त्यामुळे जगभरातील दहशतवादी संघटना यावेळेचा गैरफायदा उठवू शकतात.'
'जैविक हल्ल्यामुळे हिंसाचार वाढू शकतो. त्यामुळे कोरोनाच्या साथीविरोधात लढण्यासाठी सुरू असलेल्या आपल्या प्रयत्नांना धक्का बसू शकतो. या कठीण परिस्थितीतही आरोग्य सुविधा पोहोचवण्यामध्ये सुरू असलेला भेदभाव, प्रसारमाध्यमांवरील निर्बंध, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी अशा बाबीही आपण पाहत आहोत. तसेच कोरोना विषाणूमुळे स्थलांतरित आणि वंचितांसमोर मानवाधिकारांचे संकट उभे राहू शकते,' अशी भीतीही गुटोरेस यांनी व्यक्त केली.