Corona Vaccine : Pfizer प्रमुख म्हणतात, "१२ महिन्यांत लसीच्या तिसऱ्या डोसची गरज भासू शकते"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 11:56 AM2021-04-16T11:56:01+5:302021-04-16T11:57:34+5:30
Coronavirus Vaccine : कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी वार्षिक लसीकरणाची आवश्यकता असल्याचं व्यक्त केलं मत.
सध्या जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. गेल्या वर्षी कोरोनाची सुरू झालेली महासाथ अद्यापही कायम आहे. आतापर्यंत जगभरात कोट्यवधी लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतासह काही देशांनी लसही विकसित केली आहे. अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, ही लस किती काळासाठी कोरोनापासून संरक्षण करू शकते याबाबत अद्यापही संशोधन सुरू आहे. Pfizer प्रमुखांनी याबाबत एक मोठं वक्तव्य केलं असून लसीकरणाच्या १२ महिन्यांच्या आत त्यांच्या कंपनीच्या लसीच्या तिसऱ्या डोसची गरज भासू शकते, असं मत Pfizer चे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोरला यांनी व्यक्त केलं.
"कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आपल्याला वार्षिक लसीकरणाची गरज भासू शकते. याचा क्रम काय असेल आणि ते तसं किती वेळा करावं लागेल याची अद्याप माहिती घेणं बाकी आहे," असं बोरला म्हणाले. सीएनबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "कोरोनाच्या लसीच्या तिसऱ्या डोसची आवश्यकता भासेल अशी शक्यता आहे. हा कालावधी ६ महिने किंवा १२ महिन्यांच्या मध्ये असू शकतो. त्यानंतर वार्षिक लसीकरणाचीही गरज भासू शकेल. परंतु या सर्व बाबींची पुष्टी होणं बाकी आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
सध्या ही लस किती काळापर्यंत कोरोना विषाणूपासून रक्षण करू शकेल याचा शोध घेण्याचं काम संशोधकांकडून सुरू आहे. Pfizer नं या महिन्याच्या सुरूवातीला एक अहवाल प्रकाशित केला होता. यामध्ये ही लस ९१ टक्के प्रभावी ठरू शकते असा दावा करण्यात आला होता. तसंच दुसऱ्या डोसनंतर गंभीर प्रकरणांमध्ये सहा महिन्यांपर्यंत ही लस ९५ टक्के प्रभावी ठरत असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, सहा महिन्यांनंतर ही लस प्रभावी ठरेल की नाही हा संशोधनाचा विषय असल्याचंही सांगण्यात आलं आहे.