Coronavirus : धक्कादायक! वुहानमधल्या कोरोनाच्या प्रकोपाची माहिती उघड करणारे तीन पत्रकार गायब; चीनही चिडीचूप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 12:54 PM2020-04-16T12:54:13+5:302020-04-16T13:29:41+5:30
विशेष म्हणजे चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं उघड करणारे तीन पत्रकार आता गेल्या दोन महिन्यांपासून गायब आहेत.
बीजिंग- जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, अनेक देशांनी आता ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या वुहानमध्ये या कोरोना व्हायरसचं केंद्रबिंदू असल्याचं अमेरिकेनं वारंवार सांगितलं आहे. चीननं कोरोनासंदर्भातील माहिती जगापासून लपवल्याचाही आरोप अमेरिकेनं केला आहे. विशेष म्हणजे चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं उघड करणारे तीन पत्रकार आता गेल्या दोन महिन्यांपासून गायब आहेत.
चेन क्यूशी, फेंग बिंग आणि ली जहुआ या तिन्ही पत्रकारांनी चीनमध्ये पसरत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडली होती. तिघांनीही सोशल मीडियाची प्रभावी माध्यमं असलेल्या यू ट्युब आणि ट्विटरवर व्हिडीओ अपलोड करून चीनमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याची माहिती जगासमोर ठेवण्याची मागणी केली होती. त्यानंतरच हे तिन्ही पत्रकार रहस्यमयरीत्या गायब झाले आहेत.
३४ वर्षांचे चेन हे ६ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ वाजल्यापासून गायब झाले आहेत. वुहानमधल्या कोरोना व्हायरसच्या प्रकोपाची माहिती उघड करणारे चेन ६८ दिवसांपासून गायब आहेत. कृपया त्यांना वाचवा, अशी विनंती त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. फेंग बिंग यांनी ९ फेब्रुवारीला सोशल मीडियावर काही व्हिडीओ टाकल्यापासून ते गायब झाले आहेत. फेंग यांनी अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये वुहानमध्ये कोरोनानं मृत्युमुखी पडलेले मृतदेह पाहायला मिळत होते. गायब होण्यापूर्वी त्यांना चीनच्या सरकारनं अटकही केली होती. काही अधिकारी त्यांच्या शरीराचं तापमान तपासण्याच्या बहाण्यानं आले आणि त्यांना घेऊन गेले. तेव्हापासून ते परतलेच नाहीत. तर २५ वर्षीय ली जहुआ हेसुद्धा चीनमधले जाणकार पत्रकार आहेत. चीनमधल्या एका वृत्तवाहिनीसाठी ते काम करत होते. त्यांना शेवटचं २६ फेब्रुवारीला पाहण्यात आलं, त्यानंतर ते गायबच आहेत. वुहानमध्ये ज्या भागात कोरोनाच्या प्रभाव सर्वाधिक होता, त्या भागांवरून या पत्रकारांनी ग्राऊंड रिपोर्टसुद्धा केला होता. तिथली सगळी परिस्थिती या पत्रकारांना ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी चिनी सरकारकडे ही आपत्ती जगासमोर उघड करण्याची मागणी केली होती.
चेन क्यूशी, फेंग बिंग आणि ली जहुआ हे तिन्ही चिनी नागरिक होते. त्यांनी कोरोना व्हायरस पसरत असलेल्या घटनास्थळी जाऊन वृत्तांकन केलं होतं. त्यांना या साथीच्या रोगाबद्दल सोशल मीडियावर वाचत्या केल्यानं शिक्षा झाल्याची आता चर्चा आहे. विशेष म्हणजे हे पत्रकार गायब असतानाही चीननं त्यांच्याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.