Coronavirus: कोरोनाबाबत चौकशी करण्यासाठी अमेरिकन तज्ज्ञांची टीम चीनला पाठवायची होती पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 01:12 PM2020-04-20T13:12:08+5:302020-04-20T13:15:30+5:30
अमेरिकेत कोरोनामुळे ४१ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
वॉश्गिंटन – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनामुळे जगातील अन्य देशांवर संकट उभं राहिलं आहे. कोरोना व्हायरसची उत्पती नेमकी झाली कशी? यावरुन चीन आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. जर कोरोना व्हायरसला चीन जबाबदार असेल तर त्याचे परिणाम भोगायला तयार राहावं असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिला आहे.
अमेरिकेत कोरोनामुळे ४१ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसाचा फैलाव कसा झाला? याची चौकशी करण्यासाठी अमेरिकेच्या तज्ज्ञांची टीम चीनला पाठवायची आहे असं ट्रम्प म्हणाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, कोरोनाबाबत चीन माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. चीनच्या अशा वागणुकीमुळे आम्ही नाराज आहोत. आम्ही चीनला विचारलं होतं की नेमकं चीनमध्ये काय चाललं आहे? आम्ही तिथे जाऊ इच्छितो, तिथे काय सुरु आहे याची माहिती घ्यायची आहे. पण आम्हाला तिथे बोलवण्यात आलं नाही. जेव्हापासून कोरोना संसर्ग सुरु झाला आहे तेव्हापासून चीनच्या संबंधावर आम्ही आनंदी नाही. कोरोना व्हायरस चीनच्या वुहान येथील लॅबमध्ये बनला त्यानंतर तो दुर्घटनेत बाहेर आला असा आरोप अमेरिकेने केला आहे.
कोरोना विषाणूशी संबंधित असलेल्या चीनच्या वागणुकीमुळे ट्रम्प यांनी वारंवार निराशा व्यक्त केली. बीजिंगने या संकटाला तोंड देण्यासाठी सुरुवातीला वॉशिंग्टनला सहकार्य केले नाही किंवा पारदर्शकताही घेतली नाही. तपासणीच्या आधारे आम्ही हे शोधून काढणार आहोत असं ट्रम्प म्हणाले, तत्पूर्वी एक दिवस अगोदर ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला होता की जर चीन मुद्दाम हा विषाणूचा प्रसार करण्यासाठी जबाबदार आढळल्यास त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असं सांगण्यात आलं होतं.
दरम्यान, अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेंस यांनी रविवारी सांगितले की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनवर खूश नाहीत कारण वुहानमधून सुरु झालेल्या महामारीबाबत अमेरिकेशी संवाद साधण्यात अपयशी ठरले. पेंस यांनी आश्वासन दिले की अमेरिका कोविड -१९ संसर्गाची तपासणी जोरदार सुरु करेल, ज्यामुळे देशाची प्रगती होईल आणि ट्रम्प प्रशासनाच्या योजनेनुसार अर्थव्यवस्था पुन्हा वेगवान होईल. जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेला माहिती देण्यास चीनने दिरंगाई केली. आम्ही योग्य वेळी तपासणी करु असं अमेरिकेने स्पष्ट केलं आहे.