Coronavirus: संपूर्ण जगात धुमाकूळ घातल असलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची समोर आली दोन नवी लक्षणे, कोरोनाच्या जुन्या व्हेरिएंटपेक्षा आहेत पूर्णपणे वेगळी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 09:26 AM2021-12-31T09:26:59+5:302021-12-31T09:27:25+5:30
Coronavirus: गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूच्या Omicron Variantने आता जगाला विळखा घातला आहे. ओमायक्रॉनची दोन लक्षणे समोर आली आहेत. ही लक्षणे कोरोनाच्या जुन्या विषाणूपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत.
नवी दिल्ली/लंडन - गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने आता जगाला विळखा घातला आहे. भारतातही ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत देशामध्ये ओमायक्रॉनचे ९७६ रुग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये आहेत. दरम्यान, ओमायक्रॉनची दोन लक्षणे समोर आली आहेत. ही लक्षणे कोरोनाच्या जुन्या विषाणूपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत.
आरोग्य तज्ज्ञांकडून ओमायक्रॉनच्या लक्षणांबाबत वेळोवेळी माहिती दिली जाते. तसेच जर कुणामध्ये ही लक्षे दिसली तर त्वरित कुठल्याही तज्ज्ञाचा सल्ला घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच स्वत:ला आयसोलेट करण्याची सूचना दिली गेली आहे.
कोरोनाच्या साथीच्या गेल्या दोन लाटांदरम्यान, ताप, सर्दी-खोकला यासारखी सर्वसामान्य लक्षणे दिसत होती. मात्र ओमायक्रॉनमुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेल्या युनायटेड किंग्डममधील एका संशोधखाने आमायक्रॉनच्या दोन नव्या लक्षणांची ओळख पटवली आहे. ही लक्षणे सर्वसामान्य कोरोना विषाणूशी संबंधित नाही आहे.
किंग्स कॉलेज लंडनमध्ये जेनेटिक एपिडेमियोलॉजीचे प्राध्यापक टिम स्पेक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉनची दोन नवी लक्षणे ही मळमळ आणि भूक न लागणे ही आहेत. त्यांच्या मते ही लक्षणे त्याच लोकांमध्ये दिसून येताहेत ज्यांना कोरोनाची लस देण्यात आलेली आहे. तसेच कोरोनाविरोधातील लसीचा बुस्टर डोस घेतलेल्या व्यक्तींमध्येही ही लक्षणे दिसत आहेत. प्राध्यापक टीम स्पेक्टर यांच्या म्हणण्यानुसार लोकांमध्ये मितली, सौम्य ताप, गळ्यामध्ये खवखव आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसत आहेत.
तर अमेरिकेमध्ये रोग नियंत्रण केंद्राने दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉनशी संबंधित काही सामान्य लक्षणे खोकला, थकवा, कफ आणि नाक गळणे ही आहेत. काही आठवड्यांपूर्वी सिंगल सेल डाग्नोस्टिक कंपनी IncellDx साठी काम करणाऱ्या डॉ. ब्रूस पॅटरसन यांनी दावा केला होता की, गेल्या व्हेरिएंटप्रमाणे या व्हेरिएंटमध्ये चव आणि वास घेण्याची क्षमता बंद होत नाही आहे. ओमायक्रॉन, पॅरेनफ्लुएंजा नावाच्या विषाणूसारखा दिसतो.