coronavirus : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 08:28 PM2020-04-12T20:28:43+5:302020-04-12T20:33:13+5:30
कोरोनाची लागण झाल्यानंतर जॉन्सन यांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
लंडन - कोरोनाची लागण झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाची लागण झाल्यानंतर जॉन्सन यांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आठवडाभराच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने सांगितले.
दरम्यान, यशस्वी उपचार करून जीव वाचवल्याबद्दल जॉन्सन यांनी काही दिवसांपूर्वी डॉक्टरांचे आभार मानले होते. जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी काही वेळ लागेल, असे इंग्लंडच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी सांगितले होते. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोना झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालवल्याने मंगळवारी आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते. मात्र, नंतर त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना आयसीयूतून बाहेर आणून सामान्य वॉर्डमध्ये हलवले होते.
27 मार्च रोजी जॉन्सन याांना कोरोना संक्रमण असल्याचे समोर आले होते. जॉन्सन यांनी स्वतःच यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली होती. तसेच त्यांच्या वाग्दत्त वधूलाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर जॉन्सन यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात ते पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ते तिथूनच देशाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. मात्र, त्यांची प्रकृती अचानक खालवली होती. यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.