CoronaVirus : अमेरिकेत कोरोनाचा कहर, २४ तासांत ११५० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 09:17 AM2020-04-07T09:17:19+5:302020-04-07T09:29:05+5:30
Coronavirus : अमेरिकेत आतापर्यंत १०००० लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसमुळे जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता देशासह अनेक जगभरातील देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. बहुतांश देशांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे.
अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ११५० लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १०००० लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत ३६६००० लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये गेल्या २४ तासांत ३०००० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत अमेरिकेत १०७८३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
United States records 1,150 #Coronavirus deaths in 24 hours: AFP news agency quoting Johns Hopkins tracker
— ANI (@ANI) April 7, 2020
जगभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत ७०००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जवळपास ५०००० लोकांचा मृत्यू युरोपीयन देशांमध्ये झाला आहे.
भारतात सुद्धा कोरोनोमुळे चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांचा देशात कोरोनाचे ७०४ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासांत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत ४२८१ लोकांनी कोरोनाची लागण झाली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती खालावली...
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, त्यांची प्रकृती खालवल्याने आयसीयूमध्ये हलविण्यात आले आहे. यामुळे ब्रिटनमध्ये त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. तर अनेकांनी त्यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना केली. बोरिस जॉन्सन यांना 27 मार्चला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. बोरिस जॉन्सन यांनी स्वतःच यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली होती.