coronavirus : अमेरिकेत एक दिवसात हजारांवर कॊरोनाबळी, रुग्णांची संख्या दोन लाखांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 08:42 AM2020-04-02T08:42:12+5:302020-04-02T10:31:19+5:30
वेगाने वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे महाशक्ती असलेल्या अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे.
न्यूयॉर्क - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे अमेरिकेमध्ये भीषण परिस्थिती ओढवली आहे. वेगाने वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे महाशक्ती असलेल्या अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. काल एका दिवसात अमेरिकेत कोरोनाची बाधा झालेले सुमारे 26 हजार 473 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील एकूण रुग्णांची संख्या दोन लाखांच्यावर पोहोचली आहे. तर कालच्या एका दिवसात 1 हजार 49 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 5 हजार 102 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या फैलावाचा वेग जगभरात कायम असून, जगभरातील कोरोनाबधितांचा आकडा 9 लाख 35 हजारांच्या वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे मृतांची संख्या 47 हजार 192 झाली आहे. दरम्यान, कोरोनामुळे काल एका दिवसात जगभरात 4 हजार 883 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अमेरिकेत एका दिवसात 1049 जणांचा मृत्यू झाला आहे. तर युरोपमधील इटली आणि स्पेनमध्येही कोरोनाचे थैमान सुरू आहे. इटलीमध्ये मृतांचा आकडा 13 हजार 153 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये काल एका दिवसात 923 जणांचा मृत्यू झाला. तसेच 9 हजारांच्या आसपास नवे रुग्ण आढळल्याने स्पेनमधील कोरोनाबधितांचा आकडा 1 लाख 4 हजार 118 पर्यंत पोहोचला आहे.
अमेरिकेचे 9/11च्या हल्ल्यापेक्षाही मोठे नुकसान
कोरोना व्हायरसपुढे महासत्ता म्हणवली जाणारी अमेरिकाही पुरती हतबल झाली आहे. अमेरिकेत बुधवारी कोरोना व्हायरसमुळे मरणाऱ्यांचा आकडा 5,102 वर जाऊन पोहोचला. या आकड्याने अमेरिकेवर 9/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या आकड्यालाही मागे टाकले आहे. 2001मध्ये झालेल्या या हल्लात जवळपास ३ हजार अमेरिन नागरिकांचा मृत्यू झाला होता. येथील 190,000 हून अधिक लोक कोरोना संक्रमित आहेत.
हा जीवन मरणाचा प्रश्न आहे - ट्रम्प
अमेरिकन नागरिकांसाठी 30 दिवसांपर्यंत नियमांचे पालन करणे नक्कीच कठीन गोष्ट आहे. मात्र हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांन दोन दिवसांपूर्वीच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढवला होता. एवढेच नाही, तर कोरोनाची तुलना फ्लूशी करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले होते. कठोर नियम केलेले असतानाही मरणारांची संख्या एक ते दो लाखांपर्यंत पोहोचू शकतो, अशी शक्यता व्हाईट हाऊस टास्क फोर्सच्या सदस्य डेबोरा बर्क्स यांनी व्यक्त केली आहे.