Barack Obama Corona: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 09:20 AM2022-03-14T09:20:07+5:302022-03-14T09:21:12+5:30
Barack Obama Corona: अद्यापही कोरोना लसीकरण केले नसल्यास शक्य तितक्या लवकर करून घ्यावे, असे आवाहन बराक ओबामा यांनी केले आहे.
वॉशिंग्टन: कोरोनाचे (Coronavirus) संकट अद्यापही संपुष्टात आलेले नाही. जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. यातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. बराक ओबामा यांनी सलग दोनवेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद भूषविले होते. बराक ओबामा यांनी स्वतः ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले.
जगातील काही देशांमध्ये कोरोनाची तिसरी, चौथी लाट असून, दररोज हजारो लोकांना कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाचे अनेकविध व्हेरिएंट समोर येत असून, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक धोकादायक होत असल्याचे सांगितले जात आहे. भारतात कोरोनाची स्थिती काही प्रमाणात नियंत्रणात असल्याचे दिसत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण मोठे असून, मृत्यूदरही कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेतही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
बराक ओबामा यांनी काय म्हटलेय?
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसांपासून घसा खवखवत आहे. पण मला बरे वाटत आहे. मिशेल आणि मी लसीकरण केल्याबद्दल कृतज्ञ आहोत. तसेच लसीकरणाला प्रोत्साहनही देत आहोत. मिशेल यांची कोरोना चाचणी नॅगेटिव्ह आली आहे. कोरोनाचे रुग्ण अद्यापही आढळून येत आहेत. तरीही कोरोना लसीकरण केले नसेल, तर करून घ्या, असे आवाहन बराक ओबामा यांनी यावेळी केले.
दरम्यान, यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, जानेवारी महिन्यात दररोज सरासरी ८१०,००० केसेसच्या तुलनेत अमेरिकेत दैनंदिन प्रकरणांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा दर दररोज सरासरी ३५,००० वर आला आहे. तसेच संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील पाच आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व लोकांपैकी ८० टक्क्यांहून अधिक लोकांना कोरोना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे, असा दावा करण्यात आला आहे.