CoronaVirus News: ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता जगात जाणवणार कोरोनावरील 'या' औषधाची टंचाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 07:53 AM2020-07-02T07:53:19+5:302020-07-02T07:58:21+5:30
अमेरिकेच्या निर्णयामुळे जगभरात औषधाची टंचाई जाणवणार; कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये अडचणी येणार
वॉशिंग्टन: चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं आहे. जगातील कोरोना रुग्णांचा आकडा १ कोटीच्या पुढे गेला आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ५ लाखांहून अधिक आहे. अमेरिकेत कोरोनानं हाहाकार माजवला आहे. कोरोनावरील लस अद्याप आलेली नाही. मात्र रेमडेसिवीर औषधामुळे कोरोनाचे रुग्ण बरे होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अमेरिकेनं जगातील रेमडेसिवीरचा संपूर्ण साठा खरेदी केला आहे. त्यामुळे आता जगात रेमडेसिवीर औषधाची टंचाई जाणवणार आहे.
अमेरिकेत गेल्या २४ तासांत तब्बल ५२ हजार कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या २७ लाखांच्या पुढ गेली. जगातील जवळपास २५ टक्के कोरोना रुग्ण एकट्या अमेरिकेत आहेत. त्यामुळे अमेरिकेनं जगातील रेमडेसिवीरचा संपूर्ण साठा विकत घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता इतर देशांना पुढील दोन ते तीन महिने रेमडेसिवीर औषध मिळू शकणार नाही.
अमेरिकन कंपनी जिलाद सायन्सेस रेमडेसिवीर औषध तयार करते. हे औषध कोरोनावरील उपचारादरम्यान १०० टक्के यशस्वी होत असल्याचं अद्याप दिसून आलेलं नाही. मात्र इतर औषधांपेक्षा ते जास्त परिणामकारक ठरत असल्याचं निरीक्षणातून समोर आलं आहे. यामुळे कोरोनाचा रुग्ण लवकर बरा होतो. याशिवाय या औषधाचे साईड इफेक्ट्सदेखील कमी आहेत. ट्रम्प प्रशासनानं मे महिन्यात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिवीर वापर करण्यास परवानगी दिली होती.
आता अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागानं मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरचा साठा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका रेमडेसिवीर औषधाचे ५ लाखांहून अधिक कोर्स खरेदी करणार आहे. याआधी जिलाद सायन्सेसनं रेमडेसिवीर औषधाचा मोठा साठा अमेरिकेला दान म्हणून दिला आहे. त्यातच आता अमेरिकेनं रेमडेसिवीरचा संपूर्ण साठा खरेदी केल्यानं जगभरात या औषधाची टंचाई जाणवणार आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्याला तब्बल १00 दिवस पूर्ण; आयुष्यच बदललं, वाचा काय घडलं?
देशात कोरोना साथीचा मोठा फैलाव; एका दिवसात १८ हजारांहून जास्त रुग्ण