CoronaVirus : कोरोनाच्या लढ्याविरोधात डॉक्टरांना मोठं यश; दोन औषधं ठरताहेत रामबाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 02:17 PM2020-03-30T14:17:02+5:302020-03-30T14:19:13+5:30
अमेरिकेतही कोरोनानं थैमान घातलेलं असतानाचही तिकडच्या डॉक्टरांना मोठं यश मिळालं आहे.
वॉशिंग्टनः कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत या जीवघेण्या रोगानं ३४ हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात ७ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. अमेरिकेतही कोरोनानं थैमान घातलेलं असतानाचही तिकडच्या डॉक्टरांना मोठं यश मिळालं आहे. अमेरिकेच्या डॉक्टरांना या व्हायरसशी लढण्यासाठी दोन औषधं सापडली आहेत. त्या दोन्ही औषधांचं मिश्रण करून कोरोनाबाधित रुग्णाला दिल्यानंतर त्याच्यावर चांगला परिमाण दिसून येत आहे. एका आर्टिकलमध्ये अमेरिकेच्या डॉक्टरांनी हे दावे केले आहेत.
अमेरिकेच्या कॅन्सस सिटी शहरात डॉक्टर जेफ कॉलियर यांनी कोरोनावर थोडे संशोधन केले आहे. त्यांच्या माहितीनुसार, डायड्रोक्लोरोक्विन (hydroxychloroquine) आणि एझिथ्रोमायसिन (azithromycin) या औषधांच्या मिश्रणाचा रुग्णांवर परिणाम चांगला दिसून येतो. वॉशिंग्टन पोस्टमध्ये छापण्यात आलेल्या लेखात त्याचा उल्लेख केला आहे. ही औषधे प्रयोगशाळेत आणि रुग्णांमध्ये दोन्ही ठिकाणी वापरली गेली आहेत आणि दोन्ही ठिकाणांहून चांगले निकाल समोर आले आहेत. या दोन्ही औषधाच्या मिश्रणाचा कोरोनाबाधित रुग्णावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. मी व इतर डॉक्टरांनी मिळून या औषधांनी कोरोनाबाधित रुग्णांचा इलाज केल्यानंतर सकारात्मक चित्र दिसत आहे.
कोरोनावर औषध सापडल्याचा फ्रान्सचा दावा
फ्रान्सनेसुद्धा कोरोना विषाणूवर नवीन औषध सापडल्याचा दावा केला आहे. प्रारंभिक टप्प्यांतील रुग्णांवर हे औषध सकारात्मक परिमाण करत असून, रुग्णाला गंभीर स्थितीत पोहोचण्यापासून हे औषध प्रतिबंधित करते. फ्रान्सच्या इन्स्टिट्यूट हॉस्पिटलो युनिव्हर्सिटीच्या संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ संशोधक, प्राध्यापक डिडायर राऊ यांनी नवीन औषधाची चाचणी यशस्वीरीत्या घेतल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.
सरकारने वैज्ञानिकावर सोपवली जबाबदारी
फ्रान्स सरकारने कोरोनाच्या संभाव्य उपचारांवर काम करण्याची संशोधक, प्राध्यापक डिडायर राऊ यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. त्यांनी प्रथम संक्रमित व्यक्तीला क्लोरोक्विनचे डोस दिले. यामुळे त्या रुग्णाच्या प्रकृतीत खूप प्रभावी सुधारणा झाली. हे औषध सामान्यत: मलेरियाच्या प्रतिबंध आणि उपचारात वापरले जाते.