Coronavirus: 'मी सगळ्यांचं ऐकतो पण...'; डोनाल्ड ट्रम्प लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 09:46 AM2020-04-12T09:46:02+5:302020-04-12T09:55:46+5:30
गेल्या २४ तासात २००० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संसर्गावर नजर ठेवणारी संस्था जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. अमेरिकेतही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ लाखांहून अधिक असून आत्तापर्यंत १८ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळेम मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासात २००० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संसर्गावर नजर ठेवणारी संस्था जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळख असणाऱ्या अमेरिकेचे कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु अमेरिकेतील अर्थव्यवस्था पुन्हा खुली करण्याचा निर्णय घेणार असल्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प पत्रकार परिषदेत म्हणाले की, जगाचं अर्थचक्र हे अमेरिकेच्या भरवश्यावर सुरू असतं. त्यामुळे मी अर्थव्यवस्थेबाबत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर तुम्ही कुठल्या गणिताच्या आधारे हे बोलत आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर मी सगळ्यांचं ऐकतो पण शेवटी निर्णय माझ्या विचारांप्रमाणे घेतो असं स्पष्टीकरण डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी दिले.
लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था गर्तेत आहे. मनुष्यहानी आणि वित्तहानी या दोनमधून त्यांना निवड करायची आहे. जे सर्वाधिक कमी नुकसान करणारं असेल तो पर्याय डोनाल्ड ट्रम्प निवडतील असं बोललं जात आहे. त्यामुळे आता अर्थव्यवस्थाबाबत डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
न्यूयॉर्क हे अमेरिकेत कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. या शहरातील १.६ दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. येथे कोरोनामुळे ५२८० लोक मरण पावले आहेत. तर संपूर्ण अमेरिकेत ५ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
जगात कोरोनाबाधितांची संख्या १६ लाख ५० हजारहून अधिक
आतापर्यंत भारतासह संपूर्ण जगात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६ लाख ५० हजारहून अधिक आहे. तर एक लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३ लाख ६८ हजार ६६८ लोक या आजारापासून बरे झाले आहेत. संपूर्ण जगाच्या तुलनेत इटलीमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत १८ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.