अमेरिकेकडून भारताला आणखी एक धक्का?; हजारो विद्यार्थ्यांना मायदेशी परतावं लागण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 08:54 AM2020-07-07T08:54:15+5:302020-07-07T09:25:30+5:30
एच-१बी व्हिसानंतर आता विद्यार्थ्यांचे व्हिसादेखील रद्द; अमेरिकेच्या निर्णयाचा भारताला मोठा फटका
वॉशिंग्टन: कुवेतमधील जवळपास ७ ते ८ लाख भारतीयांना लवकरच देश सोडावा लागण्याची दाट शक्यता आहे. त्यातच आता अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनादेखील माघारी परतावं लागू शकतं. आधीच एच-१बी व्हिसा रद्द करणाऱ्या अमेरिकेनं आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाईन भरत असल्यास त्यांना देशात राहण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. त्यामुळे शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना लवकरच मायदेशी परतावं लागू शकतं.
'नॉनइमिग्रंट एफ-१ आणि एम-१ स्टुडंट व्हिसाधारक विद्यार्थ्यांचे वर्ग पूर्णपणे ऑनलाईन भरत असल्यास त्यांना अमेरिका सोडावा लागेल. त्यांना अमेरिकेतून बाहेर जायचं नसल्यास इतर शैक्षणिक संस्थांमधून प्रवेश घ्यावा लागेल. तरच त्यांचा व्हिसा वैध राहील,' असे अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि कस्टम संचलनालयानं (आयसीई) स्पष्ट केलं आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर योग्य पावलं न उचलल्यास त्यांना परिणामांचा सामना करावा लागेल, असंदेखील आयसीईनं म्हटलं आहे.
'पूर्णपणे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील सेमिस्टरसाठी व्हिसा देण्यात येणार नाही. परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अमेरिकेचा जकात आणि सीमा सुरक्षा विभाग देशात प्रवेश देणार नाही,' अशी माहिती आयसीईनं दिली आहे. अमेरिकन सरकार शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना एफ-१, तर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना एम-१ व्हिसा देतं.
अमेरिकेतल्या बऱ्याचशा महाविद्यालयांनी आणि विद्यापीठांनी त्यांचा पुढील सेमिस्टरसाठीची योजना जाहीर केलेली नाही. काही शैक्षणिक संस्था ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमांचा वापर करून हायब्रिड प्रारूप वापरण्याच्या विचारात आहेत. तर हावर्डसारख्या काही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातून अमेरिकेत गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १० लाखांहून अधिक आहे. यामध्ये चीनमधील विद्यार्थ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर भारत, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, कॅनडा यांचा क्रमांक लागतो.
चिंता वाढणार? ...तर तब्बल ८ लाख भारतीयांना कुवेत सोडावा लागणार