कोरोना विषाणू प्रतिबंधक लस जानेवारीपर्यंत येण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 05:12 AM2020-06-08T05:12:13+5:302020-06-08T05:12:18+5:30
विषाणूशास्त्र या विषयातील प्रख्यात तज्ज्ञ डॉ. लॅरी कॉरी एका चर्चासत्रात म्हणाले, ‘‘या भयंकर रोगावर लस शोधणे हे आव्हानात्मक काम आहे.
न्यूयॉर्क : जगभरात थैमान घातलेल्या कोविड-१९ या रोगावर प्रतिबंधक लस शोधण्यासाठी अनेक देशांतील शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. सर्व काही व्यवस्थित झाल्यास पुढील वर्षी जानेवारीपर्यंत ही लस शोधण्यात यश येईल, असा विश्वास अमेरिकेतील संसर्गजन्य रोगतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
विषाणूशास्त्र या विषयातील प्रख्यात तज्ज्ञ डॉ. लॅरी कॉरी एका चर्चासत्रात म्हणाले, ‘‘या भयंकर रोगावर लस शोधणे हे आव्हानात्मक काम आहे. मात्र, आपले शास्त्रज्ञ यात यशस्वी ठरतील, याबाबत माझ्या मनात संशय नाही. येणारी आरएनए व्हॅक्सिन ही माडर्ना कंपनीची असो की फिझरची, हा शोध क्रांतिकारी असेल. यासाठी आपणा सर्वांना येत्या जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करावी
लागू शकते.’’
अनेक ठिकाणी लशीच्या प्रयोगाचा पहिला, दुसरा टप्पा सुरू आहे. ही कौतुकाची बाब असली तरी यापुढे वाटचाल करताना औषधनिर्माण उद्योग, अभ्यासक, संशोधन केंद्रे तसेच जैवतंत्रज्ञान क्षेत्र या सर्वांचा आपसांत समन्वय असणे आवश्यक आहे. अनेक प्रकारची आकडेवारी सांगून या साथीबाबत दिलासा देणे विविध पातळींवरून सुरू आहे.
अर्थात ते आवश्यकदेखील आहे. मात्र, लशीचा शोध लागेल तो दिवस खऱ्या अर्थाने दिलासा देणारा असेल, असे मत नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थच्या अॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग विभागातील लस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. जॉन मस्कोला यांनी व्यक्त केले.