CoronaVirus: कोरोना लस येण्यासाठी नवीन वर्ष उजाडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 03:58 AM2020-04-25T03:58:16+5:302020-04-25T06:59:16+5:30
ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीची मानवावर चाचणी घेण्याचा प्रयोगही सुरू करण्यात आला आहे. दोन स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे.
लंडन : जगभरात लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या कोविड-१९ या रोगापासून मानव जातीला सुरक्षित ठेवण्यासाठी विविध देशांत लस विकसित करण्यावर जोमाने काम होत असून, ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीची मानवावर चाचणी घेण्याचा प्रयोगही सुरू करण्यात आला आहे. दोन स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे, दरम्यान, ही लस बाजारात येण्यासाठी नवीन वर्ष उजाडणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
स्वत:वर चाचणी करून घेण्याच्या पहिल्या टप्प्यासाठी आठशेहून अधिक लोक पुढे आले आहेत. यापैकी निम्म्या लोकांना कोविड-१९ ची लस देण्यात येणार असून, उर्वरित लोकांना मेनिन्जायटीसपासून बचाव करणारी लस दिली जाणार आहे. चाचणीसाठी पुढे आलेल्या लोकांना कोणती लस टोचणार, हे माहिती नसेल. ज्या दोघांना लस टोचण्यात आली, त्यापैकी इलिसा ग्रॅनाटो या एक आहेत.
४८ तास निगराणी
जेनर इन्स्टिट्यूच्या प्रोफेसर सराह गिल्बर्ट यांच्या नेतृत्वाखाली ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या पथकाने तीन महिने संशोधन करून ही लस विकसित केली आहे. ही लस निश्चित लागू पडेल, असा ८० टक्के विश्वास असल्याचे गिल्बर्ट यांनी म्हटले.
चाचणीचे काय परिणाम होतात, हे पाहण्यासाठी लस टोचण्यात आलेल्या व्यक्तीवर ४८ तास निगराणी ठेवली जाईल.
शास्त्रीय आणि वैद्यकीयदृष्ट्या परीक्षण केल्यानंतर कोविड-१९ पासून मानवाचे रक्षण करण्यास ही लस गुणकारी असल्याचा निष्कर्ष आल्यानंतरच या लसीचा सार्वजनिकरीत्या वापर करता येऊ शकतो, असे गिल्बर्ट म्हणाल्या.