Coronavirus: डॉक्टर कोरोनाचा बळी; रावळपिंडीतील २६ वर्षीय तरुणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 12:13 AM2020-05-06T00:13:22+5:302020-05-06T00:13:33+5:30

मात्र कोरोना आला, त्यात ती सेवेत दाखल झाली. २० एप्रिलला तिला थोडा ताप भरला. मात्र, नेहमीचा फ्लू, त्यातलाच साधा मौसमी ताप म्हणून त्याचं निदान करण्यात आलं

Coronavirus: Victim of Coronavirus; 26 year old girl from Rawalpindi | Coronavirus: डॉक्टर कोरोनाचा बळी; रावळपिंडीतील २६ वर्षीय तरुणी

Coronavirus: डॉक्टर कोरोनाचा बळी; रावळपिंडीतील २६ वर्षीय तरुणी

googlenewsNext

पाकिस्तान

पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणू अक्षरश: डॉक्टरांची परीक्षा पाहतो आहे. सुरक्षा साधनं नाहीत, व्हेंटिलेटर्स नाहीत, पीपीई किट नाहीत, साधे एन ९५ मास्क नाहीत; पण डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करत एकेक रुग्णाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, जिथं शस्त्रच
नाहीत, शस्त्र काय जिथं स्वत:च्याच जीविताची खात्री नाही, तिथं डॉक्टर इतर रुग्णांना कसे वाचविणार?

इतर रुग्णांना वाचविण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी स्वत:च बाधित होत आहेत. आणि त्यातच ३० एप्रिलला एका २६ वर्षांच्या डॉक्टर तरुणीचा कोरोनाने बळी घेतला. रावळपिंडीतली ही गोष्ट. डॉ. राबिया तय्यब रावळपिंडीतल्याच गुजर खान भागातली रहिवासी. तिचे वडील मोहंमद तय्यब हे मोठे विद्यार्थीप्रिय शिक्षक. राबिया शिकून डॉक्टर झाली आणि या १ मे पासून ती तिचा स्वतंत्र दवाखाना सुरू करणार होती.

मात्र कोरोना आला, त्यात ती सेवेत दाखल झाली. २० एप्रिलला तिला थोडा ताप भरला. मात्र, नेहमीचा फ्लू, त्यातलाच साधा मौसमी ताप म्हणून त्याचं निदान करण्यात आलं. राबिया काम करीतच राहिली. मात्र, तीन दिवसांपूर्वी तिची तब्येत फार बिघडली. तिला रावळपिंडीतल्या होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. व्हेंटिलेटरची मदतही घेण्यात आली; पण राबिया ही जंग हरली. एका तरुण डॉक्टरचा असा बळी गेला म्हणून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

मात्र, पाकिस्तानात डॉक्टरांचे हे हाल आता हळहळ व्यक्त करण्यापलीकडे गेले आहेत, असं आकडेवारीच सांगते. नॅशनल इमर्जन्सी आॅपरेशन सेंटरच्या आकडेवारीनुसार, आजवर ४४४ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात २१६ डॉक्टर्स आहेत. ६७ परिचारिका, १६१ वैद्यकीय अन्य कर्मचारी आहेत. त्यापैकी १३८ आजही दवाखान्यात दाखल असून, जगण्याची लढाई लढत आहेत. ९४ बरे झाले, तर बाकीचे आयसोलेशनमध्ये आहेत. मार्चमध्येच गिलगिट बाल्टिस्तानमध्ये उसामा रियाज या तरुण डॉक्टरचा बळी कोरोनाने घेतला.

तेव्हापासून पाकिस्तानात डॉक्टर सतत सरकारकडे मागणी करत आहेत की, आम्हाला सुरक्षा साधनं द्या. मात्र, साधनं नाहीत, पैसे नाहीत म्हणत सरकार त्याकडे कानाडोळा करत आहे, असा डॉक्टरांच्या संघटनांचा आरोप आहे. लाहोरमध्ये डॉक्टरांनी उपोषण केलं. कराचीत तर मोर्चा काढला. त्यांच्यावर तिथे लाठीचार्ज करण्यात आला. काही डॉक्टरांना अटकही झाली. डॉक्टरांकडून वतनपरस्तीची अपेक्षा एकीकडे केली जातेय, दुसरीकडे त्यांचा जीव धोक्यात आहे. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा परिस्थितीत पाकिस्तानात डॉक्टर न दिसणाºया शत्रूशी लढा देत आहेत.

Web Title: Coronavirus: Victim of Coronavirus; 26 year old girl from Rawalpindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.