CoronaVirus News : क्रूर 'ड्रॅगन'! शांघाईच्या भुकेलेल्या, तहानलेल्या लोकांना 'ड्रोन'ने धमकावतोय चीन; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 12:30 PM2022-04-07T12:30:43+5:302022-04-07T12:39:40+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: लोक खाण्यापिण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र संतप्त जनतेपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याऐवजी चीन त्यांना ‘इशारा’ पाठवत आहे.
जगात पहिल्या कोरोना व्हायरस प्रकरणाची नोंद करणारा चीन सध्या संसर्गाच्या नवीन लाटेशी झुंज देत आहे. कडक लॉकडाऊनमध्ये अनेक लोक घरामध्ये कैद आहेत आणि त्यांना खाण्यापिण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र संतप्त जनतेपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याऐवजी चीन त्यांना ‘इशारा’ पाठवत आहे. आपल्या अपार्टमेंटच्या बाल्कनीत निदर्शने करणाऱ्या शांघाईच्या लोकांना चीन ड्रोनद्वारे संदेश पाठवत आहे की, 'स्वातंत्र्यासाठी तुमच्या इच्छेवर नियंत्रण ठेवा.' चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे.
शांघाईमध्ये लोकांना घराबाहेर पडण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. खाण्यापिण्याच्या तुटवड्याचा सामना करत असलेले स्थानिक लोक त्यांच्या बाल्कनीत निदर्शने करत आहेत आणि गाणे गात आहेत. 'तुम्ही आम्हाला उपाशी का ठेवता?' असा सवाल विचारत आहेत. द इकॉनॉमिस्टच्या अॅलिस सु यांनी चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोचा हवाला देत ट्विटरवर याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक ड्रोन बाल्कनीत उभ्या असलेल्या लोकांना गाणे थांबवण्यास सांगत असल्याचे दिसून येते.
As seen on Weibo: Shanghai residents go to their balconies to sing & protest lack of supplies. A drone appears: “Please comply w covid restrictions. Control your soul’s desire for freedom. Do not open the window or sing.” https://t.co/0ZTc8fznaVpic.twitter.com/pAnEGOlBIh
— Alice Su (@aliceysu) April 6, 2022
सू यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, जीवनावश्यक वस्तुंच्या कमतरतेमुळे शांघाईचे नागरिक त्यांच्या बाल्कनीत गाण्यासाठी आणि सादरीकरणासाठी आले. त्याचवेळी कोरोना निर्बंधांचे पालन करा. स्वातंत्र्यासाठी आपल्या इच्छेवर नियंत्रण ठेवा. खिडकी उघडू नका आणि गाणे गाऊ नका असं ड्रोनच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. कोविड नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी चिनी अधिकारी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची मदत घेत आहेत, ज्यात लाऊड स्पीकरने सुसज्ज असलेल्या रोबोट डॉगचा समावेश आहे जो लोकांना 'मास्क घाला, हात धुवा, तापमान मोजा' असे संदेश पाठवतो.
चिनी अधिकाऱ्यांनी 'झिरो कोविड पॉलिसी' अंतर्गत देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरात कडक लॉकडाऊन लागू केले आहे. शांघाईचे 2.6 कोटी लोक घरांमध्ये कैद आहेत आणि मूलभूत पुरवठा करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांवर अवलंबून आहेत. चीनच्या सोशल मीडियावर शांघाईमधील लोकांचा संताप पाहायला मिळत आहे. अन्न ऑर्डर करू शकत नाहीत कारण अन्न वितरण सुविधा बंद केल्या आहेत असं म्हटलं आहे. संपूर्ण जग निर्बंध शिथिल करण्याच्या स्थितीत आले असताना चीनमधील कोरोनाबाबतची परिस्थिती गंभीर होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.