Coronavirus : चीनच्या वैज्ञानिकांचा इशारा; ‘मास्क’संदर्भात दिला महत्त्वपूर्ण सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 04:23 PM2020-04-04T16:23:39+5:302020-04-04T16:24:36+5:30
अनेक लोकांमध्ये याची लक्षणे दिसत नाहीत. अशा स्थितीत या व्हायरसपासून बाचाव करण्यासाठी लॉकडाऊन किंवा आयसोलेशन हेच पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. दर तासाला कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. या व्हायरसपासून वाचण्यासाठी अनेक देशांमध्ये मास्कची कमतरता भासत आहे. मास्कची मागणी वाढत असताना, ते वापरावे की, नाही यावर वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, प्रत्येकाने मास्क वापरणे आवश्यक नाही. त्याचवेळी चीनच्या वैज्ञानिकांनी मास्क वापरणे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
मास्क वापरणे आवश्यक नाही. ज्यांना सर्दी किंवा खोकला आहे, त्यांनीच मास्क वापरावे, असं डब्ल्यूएचओच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यानंतर शुक्रवारी अमेरिकेने पत्रक प्रसिद्ध करत, प्रत्येकाने मास्क वापरणे अनिवार्य असल्याचे म्हटले. त्याला पाठिंबा देत चीनमधील आघाडीच्या वैज्ञानिकांनी विना मास्क घराबाहेर पडणे धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
चीनी वैज्ञानिक जॉर्ज गाओ यांनी चीनच्या ‘सायन्स’ वेबसाईटशी बोलताना सांगितले की, प्रत्येकाने मास्क लावणे गरजेचे आहे. जॉर्ज गाओ ‘चायनिज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’चे प्रमुख आहेत. ते म्हणाले की, अमेरिका आणि युरोपात लोक सर्वात मोठी चूक करतायत, ती म्हणजे मास्क न वापरण्याची. कोरोना व्हायरसचा प्रसार ड्रॉपलेट्स आणि लोकांच्या संपर्कात आल्याने होतो. येथे ड्रॉपलेट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत.
आपण जेव्हा बोलतो त्यावेळी ड्रॉपलेट्स बाहेर पडत असतात. अनेक कोरोना बाधितांना दिसणारे किंवा न दिसणारे लक्षण असतात. अशा स्थितीत तुम्ही मास्क वापरत असाल तर व्हायरस तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, असही गाओ यांनी नमूद केले. अमेरिकन शास्त्रज्ञांनी देखील याचाच पुनरोच्चार करताना कोरोना व्हायरसची लागण श्वास घेताना किंवा चर्चा करताना होत असल्याचे नमूद केले.
वैज्ञानिकांच्या मते, कोरोना व्हायरस हा आजार एअरबॉर्न आहे. तो हवेच्या माध्यमातून वेगाने पसरतो. कोरोना बाधित व्यक्तीच्या श्वासन क्रियेतून हा हवेत पसरतो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगान होत आहे. अनेक लोकांमध्ये याची लक्षणे दिसत नाहीत. अशा स्थितीत या व्हायरसपासून बाचाव करण्यासाठी लॉकडाऊन किंवा आयसोलेशन हेच पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले.