Coronavirus: कोरोना लसीच्या आम्ही एकदम जवळ; डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली 'वेळ'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 07:56 AM2020-05-04T07:56:35+5:302020-05-04T08:03:59+5:30
कोरोना विषाणूसमोर अमेरिकाही हतबल झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
वॉशिंग्टन: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, संक्रमितांची संख्याही वाढतीच आहे. कोरोनाचा अमेरिकेला मोठा फटका बसला असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यात ट्रम्प प्रशासनाला अद्याप यश मिळालेलं नाही. कोरोना विषाणूसमोर अमेरिकाही हतबल झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. कोरोनानं अमेरिकेत सर्वाधिक बळी गेले असून, अमेरिकी वैज्ञानिकांनीसुद्धा कोरोनावर लस निर्माण करण्याचे शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. कोरोनाच्या लसीच्या आम्ही एकदम जवळ आहोत. २०२० वर्ष संपण्यापूर्वीच कोरोना विषाणूवरची लस तयार करू, असा दावासुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये कोरोनावर पत्रकारांना संबोधित केलं. अमेरिका, जर्मनी, इंग्लंड आणि चीनमधील लसींच्या चाचण्यांवर लक्ष केंद्रित केले असता, 'आम्ही लसीच्या अगदी जवळ आहोत, असंही ट्रम्प म्हणाले आहेत. आमच्याकडे लस निर्माण करण्यासाठी कार्यकुशल आणि हुशार वैज्ञानिक आहेत. आम्ही सध्या प्रयोगाच्या अगदी जवळ नाही, कारण जेव्हा प्रयोग केला जातो, त्यास थोडा वेळ लागतो, परंतु आम्ही तो प्रयोग पूर्ण करून लवकरच कोरोनावरची लस तयार करू, असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.
US President Donald Trump (in file pic) says US to have coronavirus vaccine by 'end of this year': AFP news agency pic.twitter.com/xxqB0NNt55
— ANI (@ANI) May 3, 2020
व्हाइट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेला उपराष्ट्रपती माइक पेन्स आणि व्हाइट हाऊस कोरोना व्हायरस टास्कफोर्सचे समन्वयक डेबोराह बार्क्स उपस्थित होते. अमेरिकन सरकारमधील संसर्ग रोगतज्ज्ञ डॉ. अँथोनी फाउसी म्हणतात की, व्यापक वापरासाठी लस तयार होण्यास 12 ते 18 महिने लागतील. त्यानंतर अध्यक्ष ट्रम्प आणि उपराष्ट्रपती माइक पेंस यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसविरुद्ध अमेरिकेच्या लढाईत डेटाच्या माध्यमातून प्रगतीची चिन्हे आहेत. न्यूयॉर्क मेट्रो एरिया, न्यू जर्सी, कनेक्टिकट, डेट्रॉइट आणि न्यू ऑर्लियन्स या शहरांसह कोरोना हॉटस्पॉट्समध्ये देखील या साथीच्या आजारानं हाहाकार माजवला आहे, असंही पेन्स म्हणाले.